बेरोजगारांची गीतेंनी चेष्टा केल्याची संतप्त भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:07 AM2019-04-05T02:07:13+5:302019-04-05T02:07:40+5:30
३३ मिनिटांचा प्रवास । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’
अलिबाग ते पेण 30 किमी
आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री खासदार अनंत गीते यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात दोन पेपर इंडस्ट्री आणणार असल्याचे सांगितले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न आता जनता विचारत आहे. त्या कंपन्यांच्या माध्यमातून २० हजार प्रत्यक्ष आणि अन्य ३० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. आज साडेचार वर्षे होऊन गेली आहेत, प्रत्यक्षात काहीच दिसत नाही. त्यामुळे आस लावून बसलेल्या बेरोजगारांची गीतेंनी चेष्टा केल्याची संतप्त भावना पेण-दादर येथील हसुराम ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
आघाडी सरकारने काहीच केले नाही म्हणून मतदारांनी त्यांना सत्तेतून खाली खेचले आणि सत्ता भाजप-शिवसेनेला बहाल केली. आता त्यांच्या हिशेबाची वेळ आली आहे, असे अलिबाग येथील अमोल बुरुमकर यांनी स्पष्ट केले. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. मात्र, तेथे मेडिकल कॉलेज नाही, चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा नाहीत. चांगले रस्ते नाहीत, शिक्षणाच्या संधी अल्प आहेत, त्या निर्माण करणे गरजेचे असल्याची मागणी पेझारीचे करुणानंद पाटील यांनी केली. जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांबरोबरच गावागावांतील रस्ते सुसज्य आणि खड्डेविरहित झाले पाहिजेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, मोठी धरणे निर्माण झाली नाहीत. अस्तित्वातील धरणांची वेळेवर देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे, कंपन्या उभारून रोजगार निर्माण झाला पाहिजे, असे बेलोशी-अलिबागचे सुधाकर भोपी यांनी सांगितले.
भाजप सरकारने प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार असल्याचे जाहीर केले होते. भाजप सरकार केवळ जुमलेबाजी करून सत्तेवर आले होते. आता त्यांच्या फसव्या आश्वासनांना आम्ही बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी कोकणाचा कायापालट केला होता. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असता, तर कोकण आज जगाच्या नकाशावर असता. अंतुले यांचे चिरंजीव नावीद यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाबाबत ठाकूर यांना विचारले असता ठाकूर म्हणाले, नावीद यांचा निर्णय साफ चुकीचा आहे. शिवसेनेत त्यांचा वापर झाल्यानंतर त्यांना दूर केले जाईल.
निवडून येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या मतदार संघाचा विकास केला पाहिजे. अलिबागमधील प्रस्तावित कंपन्यांना ऊर्जितावस्था दिली पाहिजे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असे स्पष्ट मत अलिबागच्या वैभव ढोरे यांनी मांडले.
रोजगाराचा प्रश्न सोडवावा
च्भाजप सरकारने प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार असल्याचे जाहीर केले होते, आता त्यांच्या फसव्या आश्वासनांना मतदार बळी पडणार नाहीत. रायगड लोकसभा मतदारसंघातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी कंपन्यांची उभारणी करावी. चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करून गोरगरिबांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे, असे एकं दर प्रवाशांनी अलिबाग ते पेण ३० किमी प्रवासादरम्यान व्यक्त के ले.