नेरळ : साळोख, फोंड्याचीवाडी, नारळाचीवाडी या तीन ठिकाणी सुमारे २०० जनावरांचा छळ सुरू होता. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची खाण्या-पिण्याची व्यवस्था न करता या सर्व जनावरांना क्रूर वागणूक दिली जात असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी नेरळ पोलिसांनी छापा टाकला, त्या वेळी त्यांना एका ठिकाणी ११२, दुसऱ्या ठिकाणी ५३ तर तिसºया ठिकाणी ३० जनावरे आढळून आली असून, त्यांना अतिशय क्रूरपणे वागणूक दिल्याचे आढळल्याने नेरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळंब, साळोख हद्दीतील फोंड्याचीवाडी येथील एका शेडमध्ये बेकायदेशीर गोवंश प्राण्यांना क्रूरपणे डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी छापा टाकला असता त्यांना तेथे दाटीवाटीने गुरे बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यांना खाण्या-पिण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच त्यांना गळ्याला त्रास होईल अशा पद्धतीने बांधून ठेवण्यात आले होते.या शेडमध्ये ५३ जनावरे होती, त्यात ३५ गायी, नऊ बैल त्यात लहान वासरे आढळून आली, तर दुसºया ठिकाणी नारळ्याच्या वाडीकडे जाणाºया रस्त्यावर एका जनावरांच्या बेड्यात दहा बैल, ११ गायी, तीन वासरे, तीन रेडे, तीन म्हशी अशी ३० जनावरे आढळली. सुमारे तीन लाख ७६ हजार रुपयांची जनावरे पोलिसांना मिळून आली, त्यांनाही क्रूर वागणूक दिलेली होती. तसेच साळोख गावामध्ये एका गोठ्यात सुमारे १४ बैल, ३६ गाई, १६ वासरे, २९ रेडे, १७ म्हशी अशी एकूण ११२ जनावरे डांबून ठेवल्याचे नेरळ पोलिसांच्या निदर्शनास आले, त्यांची अंदाजे रक्कम १० लाख ४० हजार रुपये असून ही जनावरेदेखील दाटीवाटीने बांधून ठेवण्यात आली होती. या सर्व सुमारे २०० जनावरांची तपासणी पशू वैद्यकीय अधिकारी किसन देशमुख यांनी केली असून, नेरळ पोलिसांनी पंचनामा केला आहे. यातील ४० लहान जनावरांना नेरळ मोहाचीवाडी येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.यातील काही जनावरांना नंबरिंग लावून ही जनावरे मालकी हक्काची असल्याने त्यांना सिद्ध करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून, दररोज या जनावरांवर पोलीस नजर ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, ही जनावरे मालकी हक्काची आहेत का? एवढी जनावरे आली कुठून याचा शोध पोलीस घेत आहेत.या वेळी सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक, केतन सांगळे, रतिलाल तडवी, रवींद्र शेगडे, पोलीस हवालदार चंदू बामणे, नीलेश वाणी, अमोल पाटील आदीनी कामगिरी बजावली.
साळोख परिसरात जनावरांचा छळ; नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:37 PM