नेरळमध्ये अंगणवाड्यांची दुरवस्था
By admin | Published: June 25, 2017 04:13 AM2017-06-25T04:13:38+5:302017-06-25T04:13:38+5:30
कर्जत तालुक्यातील अनेक गावांमधील अंगणवाड्यांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील अंगणवाड्यांकडे स्थानिक
कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक गावांमधील अंगणवाड्यांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील अंगणवाड्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांची अवस्था बिकट बनली आहे. पावसाळ्यात तर अनेक अंगणवाड्यांच्या शेड व स्लॅबमधून पाणी पडत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक अंगणवाड्यांच्या इमारती खूप जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. विशेषत: शेलू गावातील मध्यभागी असलेली अंगणवाडीची इमारत खूप जुनी असल्याने अनेक वर्षांपासून मोडकळीस आली आहे. इमारतीची दुरुस्ती व नव्याने उभारण्याची मागणी होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीने याकडे मात्र डोळेझाक केली आहे. अंगणवाडी सेविकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे, तसेच अंगणवाड्यांमध्ये वीजजोडणीसंदर्भात ग्रामसभेतही प्रश्न उपस्थित केले आहेत; परंतु याकडे गांभीर्याने विचार केला जात नाही.
माजी पंचायत समिती सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य याच ग्रामपंचायत हद्दीत राहत असल्याने त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेलू ग्रामपंचायत हद्दीत एकूण ७ अंगणवाड्या असून, एखादी अंगणवाडी सोडली, तर अनेक अंगणवाड्यांच्या छपरामधून पावसाचे पाणी पडते. तसेच शेलू गावातील पोस्ट आॅफिसजवळ असलेली अंगणवाडी भाड्याच्या जागेत भरत असून, ग्रामपंचायत महिन्याला सुमारे सहा हजार रुपये या इमारतीचे भाडे अदा करते; परंतु या भाड्याच्या अंगणवाडीच्या आजूबाजूला सांडपाणी वाहत असून, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे लहान बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेलूमध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेच्या इमारती दुर्लक्षित आहेत, अशा इमारतींची दुरु स्ती करणे गरजेचे असताना याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण होत आहे.