अलिबाग : येत्या बुधवारी, १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून १० दिवसांचा लॉकडाऊन होणार असल्याने जिल्ह्यातील बाजारपेठेत मंगळवारी सकाळपासूनच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तुफान गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. किराणा, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल पंपावर प्रामुख्याने गर्दी दिसून आली. पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याने तळीरामांनीही दारूच्या दुकानांत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र, बाजरपेठेत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला होता.लॉकडाऊनचे निर्देश दिल्याची बातमी सोमवारी दुपारपासूनच संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने अलिबागकरांनी जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी आपला मोर्चा वळविला. या दरम्यान, व्यावसायिकही आता लॉकडाऊन होणार असल्याने अधिकचे समान खरेदी करण्याचे नागरिकांना आवाहन करीत होते. कोरोनाचे संकट जिल्ह्यात वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला.कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजीपाला, तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत सकाळी ७ वाजल्यापासून आठवडा बाजार भरल्याप्रमाणे गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पूर्णत: धाब्यावर बसविण्यात आला होता. बाजारपेठेत वारंवार होणाºया अशा गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता असतानाही, त्याकडे अनेक नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण कसे आणणार? असा प्रश्न पोलिसांना पडला होता.किराणामालाचे दुकान, भाजीपाला, औषधे, कांदे, बटाटे, दूध हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांकडून मर्यादित अंतर ठेवण्याचा नियम पायदळी तुडविला जात आहे. काही औषध दुकाने, तसेच अन्य काही दुकानांमध्ये साहित्य खरेदी करताना काही फुटांचे मर्यादित अंतर नगरपालिकेने आखून दिलेल्या चौकोनात उभे राहून पाळले जात आहे. कोरोनाची साखळी हद्दपार करण्यासाठी १५ जुलैपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा १० दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या घोषणेने बाजारात गर्दी, सामाजिक अंतराचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:59 PM