ताई, माई, आक्का...च्या घोषणा झाल्या विरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:37 PM2019-10-15T23:37:45+5:302019-10-15T23:38:19+5:30
निवडणूक प्रचाराचा बदलता फंडा : उमेदवारांकडून समाजमाध्यमांचा वापर
विनोद भोईर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : निवडणूक म्हटले की प्रचार आला आणि प्रचार म्हटले की घोषणा आल्या. मागे वळून पाहिल्यास घसा दुखेसतोवर उमेदवाराच्या नावाने मत मागणारे कार्यकर्ते घोषणा देताना डोळ्यासमोर उभे राहतात. जीप किंवा ट्रक, टेम्पोतून फिरणारे कार्यकर्ते, गाडीला लावलेला पक्षाचा झेंडा आणि तत्कालीन ठेवणीतल्या घोषणांनी निवडणुकीची वेगळी वातावरण निर्मिती व्हायची. आता प्रचाराची पद्धत बदलली आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव स्पष्ट दिसत आहे.
लोकशाहीत निवडणुकांना फार मोठे महत्त्व आहे. आपला नेता कोण आणि कसा असावा? याची निवड करण्याचा पूर्ण अधिकार मतदाराला आहे. त्यामुळे या मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणूक काळात सतत मतदारांशी संवाद साधत असतात. त्यासाठी मोठमोठ्या सभा आयोजित केल्या जातात.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. रायगडात सात जागांसाठी निवडणूक होत आहे. पेणमध्ये मुख्यमंत्र्यांची झालेली सभा वगळता जिल्ह्यात फार मोठ्या सभा घेतल्याचे पाहावयास मिळत नाहीत. मागे वळून पाहताना अगदी सन २००० पर्यंतच्या काळात झालेल्या निवडणुका या अधिकच प्रचाराच्या दृष्टीने लक्षात राहणाऱ्या आहेत. ‘येऊन, येऊन येणार कोण...आहेच कोण किंवा ताई, माई, आक्का.... मारा शिक्का’, अशा काही घोषणांनी गाव, शहर, गल्ली जागे करणारा तो प्रचार होता.
घोषणांचे आवाज कानावर पडताच लहान, थोर सारेच कुतूहलाने घरातून बाहेर यायचे. एक वेगळीच वातावरण निर्मिती केली जात
होती.
मतदारांपर्यंत पोहोचण्याची पद्धत बदलली
च्निवडणूक गाव पातळीवरची असो वा राज्य, केंद्र स्तरावरील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेणे ही जुनी परंपरा आहे. २५ ते ३० वर्षांपूर्वी पक्षीय कार्यकर्ते गावातील तरुणांशी संवाद साधत त्यांच्या इच्छा, अपेक्षा जाणून घेत त्या तरुणांकडूनही क्रिकेटचे किट, व्हॉलीबॉल किट तत्सम काही अपेक्षा व्यक्त होत. आता याची जागा पार्ट्यांनी घेतली. गावागावांतून महिला, पुरुषांच्या सहली काढल्या जाऊ लागल्या. जशी मतदारापर्यंतपोहोचण्याची पद्धत बदलली, तशाच मतदारांच्या अपेक्षाही बदलल्या. एकूणच निवडणूक प्रचाराचा फंडाच बदलल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.
फिरता, धावता प्रचार पडला मागे
च्काळ बदलला प्रचाराचा वेग वाढला आणि त्याबरोबरच प्रचाराची पद्धतही बदलली. प्रसारमाध्यमांची संख्या वाढली. बातम्यांचे खासगी चॅनल्स निर्माण झाले. त्यात समाज माध्यमांनी तर सर्वांनाच प्रभावित केले.
च्फेसबुक, व्हॉट्स अॅपसारखी माध्यमे हाताच्या बोटावर खेळवता येत असल्याने फार कष्ट न घेता मतदारांपर्यंत पोहोचता येते. व्हिडीओ, मेसेज, बॅनर यांच्या माध्यमातून प्रभावीपणे आपले म्हणणे मतदारांपर्यंत पोहोचवता येत आहे.
च्त्यामुळे या माध्यमांचा वापर करण्याकडे उमेदवारांचा कल वाढत आहे. बघता बघता फिरता धावता प्रचार मागे पडला. आता क्वचितच प्रचाराच्या घोषणा कानावर पडतात.