भरत गोगावलेंना डावलल्याने नाराजी; रायगडमध्ये शिवसैनिक राजीनाम्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 10:56 PM2020-01-11T22:56:01+5:302020-01-12T06:35:01+5:30
हॅट्ट्रिक करूनही मंत्रिमंडळात स्थान नाही
दीपक साळुंखे
बिरवाडी : महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांचा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्याने जिल्ह्यामधील सामान्य शिवसैनिक नाराज झाला आहे. गोगावले यांना मंत्रिपद द्या, या मागणीकरिता शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपला राजीनामा थेट मातोश्रीवर पाठविण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार, १८ जिल्हा परिषद सदस्य, अनेक नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती व अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या समीकरणांमध्ये रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेले असल्याने तसेच तीन वेळा निवडून आलेले आमदार भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने सामान्य शिवसैनिक नाराज आहेत. शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये ही नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठवणार आहेत. या बैठकीसंदर्भात कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या नाराजीची दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगडमधील शिवसेना संघटनेला न्याय देणार का? की पुन्हा रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात फक्त सुनील तटकरेंचा दबदबा कायम राहणार, अशी चर्चा सध्या आहे.
जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांनी मोठा संघर्ष करून विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद वाढविली आहे. यामध्ये अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विजय संपादन करून शिवसेना संघटनेला नवीन उभारी दिली. तर महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी विजयी हॅट्ट्रिक केल्याने पक्षनेतृत्व रायगडला मंत्रिपदाचा मान देतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदललेल्या राजकीय गणितांचा फटका जिल्ह्यामधील शिवसेना संघटनेला अधिक बसल्याची भावना सामान्य शिवसैनिकांमध्ये तयार झाली आहे.ग्रामपंचायत ते थेट लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना संघटनेचे काम करून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना पक्षाकडूनच न्याय दिला जाणार नसेल तर मातोश्रीवर राजीनामा पाठवून लक्ष वेधण्याचा निर्धार शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करून निवडून आलेले आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयामुळे शिवसेनेची ताकद रायगड जिल्ह्यामध्ये वाढलेली असताना पक्ष नेतृत्वाने रायगड जिल्ह्याकडे पाठ फिरवत मंत्रिमंडळात रायगडचे आमदार भरत गोगावले यांना स्थान न दिल्याने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे रायगडमध्येही शिवसेना पक्षात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.