अलिबाग : रायगड जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत शुक्रवारी रायगड जिल्ह्यासाठी २०१६-१७ साठी ३ हजार ५० कोटी रुपयांचा वार्षिक कर्ज योजना आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये प्राथमिक क्षेत्रासाठी १७०० कोटी रु पये तर प्राथमिक क्षेत्राव्यतिरिक्त १८०० कोटी रुपयांचा समावेश आहे.वार्षिक कर्ज योजनेंतर्गत कृषी क्षेत्रासाठी ३४७.७० कोटी रुपये, गृह, शैक्षणिक व इतर उद्योगांसाठी १२९५.८० कोटी रुपये, तर या क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी ५६.८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रसंगी जिल्हा वार्षिक कर्ज योजनेच्या सिडीचे प्रकाशन अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.डी.मलीकनेर यांच्या हस्ते करण्यात आले. मागील वर्षासाठी रायगड जिल्ह्यातील बँकांनी कृषी कर्जासाठी १०९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल व यामध्ये कोकण विभागात रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर आणल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व बँकांचे अभिनंदन करु न या क्षेत्रात अशीच कामगिरी पुढील वर्षात बँकांनी करावी असे आवाहन मलीकनेर यांनी यावेळी केले. या बैठकीत लीड बँकेचे मॅनेजर टी.मधुसूदन यांनी वार्षिक योजनेचे सादरीकरण केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.डी.मलीकनेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, बँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोजकुमार करन, रिझर्व बँकेचे महाव्यवस्थापक सोमन भट्टाचार्य, रायगड जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक टी. मधुसूदन, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक आदींसह जिल्ह्यातील विविध बँकांचे जिल्हा व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
३ हजार ५०० कोटींचा वार्षिक कर्ज योजना आराखडा मंजूर
By admin | Published: March 19, 2016 12:45 AM