निनावी पत्राने भूमाफियांचे मनसुबे मिळणार धुळीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:47 AM2019-08-10T00:47:01+5:302019-08-10T06:27:38+5:30
निनावी तक्रार अर्जाने खळबळ; कर्जतमध्ये बोगस मालक उभे करून करोडोंच्या व्यवहाराचा घाट?
अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध प्रस्तावित प्रकल्पांमुळे जमिनींचे दर हे आकाशाला भिडले आहेत. याचाच फायदा काही भूमाफिया बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन हजारो हेक्टर जमिनी गिळंकृत करण्याच्या तयारीत आहेत. सरकार आणि प्रशासनाने अशा बोगस व्यवहारांची नोंद न करण्याबाबतचे एक निनावी पत्र ६ ऑगस्टला रायगडच्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. कर्जत तालुक्यातील २०० गुंठे जमिनीच्या व्यवहारावर प्रकाश टाकणारा उल्लेख या पत्रामध्ये केला आहे. जिल्हा प्रशासनाने पत्राची दखल घेतली आहे.
कर्जत तालुक्यातील ममदारपूर या गावातील २०० गुंठे जमिनीचे मालक हे परदेशात राहतात. याच जमिनीचे बोगस मालक उभे करून तीच जमीन कंपन्यांना कोट्यवधी रुपयांना विकण्याचा प्रयत्न काही भूमाफियांनी सुरू केला आहे. या जमिनीचे मालक हे बरीच वर्षे जमिनीकडे फिरकलेच नाहीत. त्याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रार निनावी असली तरी तक्रारीमधील जमिनीचे वर्णन आणि परदेशी वास्तव्यास असणाऱ्या मालकांची नावे ही सरकारच्या ऑनलाइनवरील माहितीशी जुळत असल्याने प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणात सरकारने दुय्यम निबंधक कर्जत यांना अशा प्रकारचा जमीन व्यवहार नोंदण्यासाठी आल्यास खºया मालकांची ओळख पटवूनच त्याची नोंद करावी अशी मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.
मयत व्यक्ती, राज्याबाहेर किंवा परदेशात राहत असलेल्या व्यक्तींचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून जमिनींची विक्री करून खरेदीखत नोंदविणाऱ्या टोळीतील सात आरोपींना रायगडच्या पोलिसांनी गजाआड केले होते. आरोपींकडून दहा लाख ५० हजार रुपयांच्या रकमेसह गुन्ह्यासाठी वापरलेली यंत्रसामग्रीही जप्त केली होती. गुन्ह्यातील अन्य पाच जण फरार आहेत तसेच अलिबाग तालुक्यामधील करूळ येथील तर सरकारी जमीन दहा कोटींना विकल्याप्रकरणी एका उद्योगपतीला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे उदाहरण देखील ताजेच आहे.
बोगस व्यवहारांना काही भ्रष्ट महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी पाठीशी घालत असल्याने त्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य होणार नाही, तसेच हे भूमाफिया गुंड प्रवृत्तीचे असल्याने थेट तक्रार करण्यासाठी कोणीच पुढे येणार नसल्याचेही अर्जात नमूद केले आहे. प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निनावी पत्राची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल
कर्जत तालुक्यातील ममदारपूर येथील सुमारे २०० गुंठे जमिनीबाबत बोगस व्यवहार होण्याची शक्यता असल्याने याबाबत तातडीने चौकशी करून तसेच अभिलेखात पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी तसेच कर्जतचे तहसीलदार यांना दिले आहेत. त्यामुळे बोगस व्यवहारांना आळा बसण्यास मदत मिळणार आहे.
गुन्ह्याची पद्धत
सराईत भूमाफिया प्रथम सखोल माहिती मिळवून सर्व प्रथम त्या जागांचे सातबारा उतारे, अन्य महसुली उतारे प्राप्त करतात. त्यानंतर तोतया व्यक्ती उभ्या करून सर्व प्रथम त्यांची त्याच नावांची बनावट आधार कार्ड तयार करून घेतात. त्या बनावट आधार कार्डच्या आधारे बनावट नावे असणारी पॅन कार्ड तयार करून घेतली जातात. त्यानंतर त्यांच्या नावावर असणारी जागा खरेदीखत नोंदवून विक्री केली जाते. तसेच या व्यवहारात मिळालेल्या रकमेचे चेक वटविण्याकरिता बनावट बँक खाती उघडून त्याद्वारे रोख रक्कम काढून घेतली जाते. काही कालावधीनंतर जागा खरेदी केलेल्या व्यक्तीला या व्यवहारात फसवणूक केल्याचे लक्षात येते. रायगड जिल्हा हा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर मुंबई-पुणे या मोठ्या शहरांसाठी जवळचा असल्याने येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे फसवणुकीच्या घटना घडत आहेत. जमीन खरेदी-विक्री करण्यापूर्वी खात्री करूनच निर्णय घेतला पाहिजे, असा सूर उमटत आहे.