लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड : महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील अन्य एका आराेपीला आज पाेलिसांनी अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिक युनूस अब्दुल रज्जाक शेख (रा. खारकांड मोहल्ला, महाड) असे आराेपीचे नाव आहे. दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे याला आधीच अटक करण्यात आली आहे. त्याला 30 आॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. अब्दुल रज्जाक शेख याला अटक केल्याने अटक आराेपींची संख्या आता दाेन झाली आहे, तर चार आराेपी फरार आहेत.
24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली हाेती. या दुर्घटनेत 16 रहिवाशांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले. विकासक (बिल्डर) फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तू विशारद गाैरव शहा, महाड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दिपक जिंजाड, तत्कालीन अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर सदाेष मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. युनूस शेख याचाही या इमारत बांधकाम व व्यवहारांशी संबंध असल्याच्या या इमारतीच्या रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर युनूस शेख याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळी त्याला पोलीसांनी अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.