गोवा महामार्गासाठी आणखी एक डेडलाइन!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:04 AM2020-03-02T00:04:55+5:302020-03-02T00:05:01+5:30
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक डेडलाइन सरकारने दिली आहे.
पाली : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक डेडलाइन सरकारने दिली आहे. जून २०२० पर्यंत या महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. यापूर्वीही सरकारने २०१४ पासून चार वेळा अशाप्रकारे डेडलाइन दिली होती.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडल्यामुळे रायगडकरांचे हाल होत आहेत. वाहतूककोंडी, अपघात आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण आहेत. त्यामुळे या महामार्गाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? असा तारांकित प्रश्न पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी विचारला होता. पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या टप्प्यात एकूण २७ ठिकाणी अंडर पासेस असून, वाशी नाका व इतर जोडरस्त्यांवर जंक्शन विकास करण्यात येत आहे. खारपाडा ते कोलाडदरम्यान सब वे व सर्व्हिस रोड करणे, ही कामे मूळ मंजूर करारनाम्याव्यतिरिक्त असल्याने सद्य:स्थितीत या भागातील रखडलेले मंजूर चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे कामे विशेष मंजुरीने करण्याचे प्रस्तावित असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाच्या कामाची मुदत जून २०१४ पर्यंत होती. मात्र, विविध कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. ५४० कोटींची आर्थिक मदत मंजूर करण्यात आल्यानंतर २०१७ पासून हे काम सुरू करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत ७९ टक्के काम झाले आहे. त्यानुसार ८४ कि.मी. लांबीपैकी ५१ कि.मी.चे डीबीएम लेवलपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जून २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे प्रकल्प संचालकांनी कळविले आहे. जून २०२० पर्यंत २५० कि.मी. व मार्च २०२१ पर्यंत उर्वरित सर्व कामासह ३६६ कि.मी. काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी लेखी उत्तरात दिली आहे.