मोखाड्यात आणखी एका कुपोषित बालकाचा मृत्यू
By admin | Published: September 12, 2016 03:00 AM2016-09-12T03:00:23+5:302016-09-12T03:00:23+5:30
कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने ३० आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याच ग्रामपंचायतीमधील खोच येथील ईश्वर सवरा
रविंद्र साळवे, मोखाडाया तालुक्यातील कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने ३० आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याच ग्रामपंचायतीमधील खोच येथील ईश्वर सवरा या दोन वर्षीय बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्याच मतदारसंघात कुपोषण बळीच्या एकामागे एक घटना घडत असल्याने सवरा यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली असून या कुपोषण बळी कुटुंबाला सांत्वन करायला पालकमंत्र्यांना मात्र वेळ नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम आणि सभापती सारिका निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन सांत्वन केले मोखाड्यात कुपोषण बळीच्या एका मागोमाग अनेक घटना घडत आहेत तरी देखील येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी बालरोग तज्ञ पद रिक्त असून लवकरात लवकर ही पदे भरली जावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या पुढे कुपोषणामुळे बळी पडल्यास मंत्रालयासमोर किंवा तहसील कार्यालय समोर त्याचे अंत्यविधी केले जातील, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिली असून कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी आदिवासी विभाग आरोग्य विभाग एकात्मिक बाल विकास कार्यालय यांची सर्वांची आहे यांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी अशी प्रतिक्रि या लोकमतशी बोलताना दिली.
१९९२-९३ वावर वांगणीत उद्भवलेले कुपोषणाच्या बळींचे सत्र आजतागायत आदीवासींची पाठ सोडायला तयार नाही. दिवसेंदिवस ते कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कुपोषणाच्या आकडेवारीत भरच पडली आहे.
पालघर जिल्ह्यात ७ हजार ५२९ बालके कुपोषणाने पिडीत असून ० ते १ वर्षातील ४४१ आणि १ ते ६ वर्षातील १४६ आणि मोखाड्यात १३ अशा एकूण ६०० बालकांचा मृत्यू झाला असून मोखाड्यात ४९३ बालके मृत्यूच्या दाढेत आहेत. कुपोषणाला आटोक्यात आणण्यासाठी आजतागायत अनेक योजना अमलात आणल्या गेल्या परंतु कुपोषणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कुपोषणामुळे मोखाडा तालुका संवेदनशील असून देखील या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञ व बाल रोग तज्ञ नाहीत. २०१३ पासून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अमलात आणली तीत स्तनदा माता, गरोदर माता यांना २५ रुपयात आहार देण्याची तरतूद होती. परंतु २५ रुपयात सकस आहार कसा पुरवणार हा प्रश्न निर्माण होऊन मे महिन्यापासून या योजनेचा निधीच न आल्याने ही योजनाच कुपोषित झाली आहे.