अलिबाग : आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट प्रकरणात हुस्नेन राजन ऊर्फअली या कोरिओग्राफरला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मुख्य आरोपी लॉरी हिचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.अलिबागमधील रेडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केला होता. यामध्ये ५ कॉलगर्ल्स, १ दलाल, २ चालक व १ ट्रॅव्हल्स एजंट यांना अटक केली होती, तर अली व लॉरी हे दोन मुख्य आरोपी मोकाट होते.पोलिसांनी गुगल साइटवर असलेल्या नंबरवरून अली याला फोन करून कॉलगर्ल्स पाठविण्यास सांगितले होते. यासाठी त्याच्या बँक खात्यात पोलिसांनी ९९ हजार भरले होते. त्यानंतर कॉलगर्ल्स रेडिसन हॉटेलमध्ये आल्या होत्या. पैसे मिळाल्याचे अली याने लॉरीला फोन करून सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ९ जणांना अटक केली होती. मात्र, अली हा फरार होता.अली व्यवसायाने कोरिओग्राफर आहे. काही हिंदी सिनेमात त्याने काम केले आहे. परदेशात त्याचे डान्स व गाण्याचे शो सुरू असतात. लॉरी हिच्यासोबत २ वर्षांपूर्वी त्याची भेट झाली. त्यानंतर हे दोघे सोशल साइट तयार आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट करून चालवीत होते. अली हा ग्राहकाचा शोध घेत असे. कॉलगर्ल्ससाठी कँडी हा परवलीचा शब्द वापरला जात होता. लॉरी ही परदेशी नागरिक असून ती गोव्यात राहत आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गोव्यात तिला पकडण्यासाठी गेले होते. मात्र, ती तेथून फरार झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तिचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 5:19 AM