अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दीर्घकाळ सुनावणी, खटल्याकडे लागल्या सर्वांच्याच नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 01:02 IST2020-11-06T00:59:53+5:302020-11-06T01:02:45+5:30
Anvay Naik suicide case: अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा ठपका रायगड पाेलिसांनी अर्णब गाेस्वामी, नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्यावर ठेवला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दीर्घकाळ सुनावणी, खटल्याकडे लागल्या सर्वांच्याच नजरा
- आविष्कार देसाई
रायगड : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांची आठ तास सुनावणी झाली. रायगड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशी हाय प्राेफाईल सुनावणी दीर्घकाळ पार पडल्याचे बाेलले जाते. या सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या हाेत्या.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा ठपका रायगड पाेलिसांनी अर्णब गाेस्वामी, नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्यावर ठेवला आहे. पाेलिसांनी तिन्ही आराेपींना बुधवारी न्यायालयात हजर केले. या प्रकरणामध्ये अर्णब गाेस्वामी हे केंद्रबिंदू असल्याने न्यायालयाबाहेर प्रचंड पाेलिसांचा फाैजफाटा बंदाेबस्तासाठी ठेवण्यात आला हाेता. रत्नागिरी आणि पालघर येथून पाेलिसांची जादा कुमक मागविण्यात आली हाेती. त्यामुळे अलिबाग शहराला पाेलीस छावणीचे स्वरूप आले हाेते.
अर्णब गाेस्वामी यांच्यासाठी वकिलांची फाैज उभी केली हाेती. दिल्ली, मुंबईमधून व्हीसीच्या माध्यमातून निष्णांत वकील गाेस्वामी यांची बाजू मांडत हाेते. त्यामध्ये ॲड. अबदाद फाेंडा यांचा समावेश हाेता. दाेन्ही बाजूंकडून जाेरदार युक्तिवाद करण्यात आले. सारडा आणि शेख यांची बाजू मांडण्यासाठीही वकील उपस्थित हाेते. त्यामुळे सुनावणी उशिरापर्यंत सुरू हाेती. दाेन टप्प्यांत पार पडलेल्या या सुनावणीमध्ये प्रचंड खडाजंगी झाली. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेली सुनावणी रात्री साडेअकरा वाजता संपली. आराेपींना पाेलीस काेठडी मिळावी यासाठी याआधी इतकी दीर्घकाळ सुनावणी कधी झाल्याचे आठवत नाही. निंबाळकर खून खटल्यातही एवढा वेळ सुनावणी झाली नाही. मात्र गाेस्वामी प्रकरणात न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतरही निकाल दिल्यावरच कामकाज संपले, असे ज्येष्ठ वकिलांनी सांगितले.