मधुकर ठाकूर
उरण: जेएनपीएच्या ७६ हजार २२० कोटी खर्चाच्या प्रस्तावित वाढवण बंदर विकसित करण्याच्या कामात भागीदार म्हणून एपीएम टर्मिनलने सामंजस्य करार केला आहे. आगामी वाढवण बंदराच्या विकासासाठी इच्छा आणि सहकार्य करण्याबाबतचा हा करार आहे. मुंबईच्या उत्तरेस १५० किमी अंतरावर पश्चिम किनार्यावर वसलेले वाढवण बंदर हा जेएनपीए आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील एसपीव्हीद्वारे राबविण्यात येणारा प्रस्तावित प्रकल्प आहे. ७६ हजार २२० कोटी खर्चाच्या या बंदराची समुद्रातील नैसर्गिक खोली देशातील सर्वच बंदरांपेक्षा २० मीटर इतकी आहे. राष्ट्रीय महामार्ग रोड नेटवर्क आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) रेल्वे नेटवर्कशी थेट कनेक्शन असणारा प्रकल्प आहे.
तसेच प्रकल्प अत्यावश्यक प्राथमिक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण होणार असल्याने विकसित होणार्या या बंदराची वार्षिक कंटेनर मालाची हाताळणीची क्षमता २३ दशलक्ष टीईयुस तर मालवाहतूक करण्याची क्षमता २५४ दशलक्ष टन असणार आहे. बंदराच्या २० मीटर खोलीमुळे प्रस्तावित वाढवण बंदरात २० हजार कंटेनर क्षमतेची मोठी मालवाहू जहाजे सहजपणे ये-जा करु शकणार आहेत. प्रस्तावित वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यानंतर जागतिक स्तरावर १० व्या क्रमांकावर येणार असुन ग्रीन फ्युएल हब म्हणूनही काम करेल असा विश्वास करारधारकांकडून व्यक्त केला जात आहे.
या बंदरातील जेएनपीए आणि एपीएम टर्मिनल यांच्यात नुकताच भागीदारीचा करार करण्यात आला आहे.केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि एपीएम टर्मिनल्सचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी कीथ स्वेन्डसेन यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूने स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.
प्रस्तावित उभारण्यात येत असलेल्या विकसित वाढवण बंदर प्रकल्पात जेएनपीए सोबत भागीदारी आणि गुंतवणूक करण्यास उत्सुक आहोत. उत्पादक, निर्यातदार, आयातदार आणि सर्वसाधारणपणे प्रादेशिक अर्थव्यवस्थेच्या वाढीस समर्थन देण्यासाठी एक आकर्षक संधी आहे.ही लक्षणीय गुंतवणूक स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यास सक्षम करेल, असा विश्वास एपीएम टर्मिनल्स एशिया मिडल इस्टचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक जोनाथन गोल्डनर यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.