मधुकर ठाकूर
उरण : चिरनेर गावात पुरासाठी कारणीभूत ठरणारी विविध नाल्यांवर धनदांडग्यांची बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याची मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.कारवाई दरम्यान ही अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळ पडल्यास नागरिक ,महिलांनाही रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल यांनी नागरिक आणि महिलांना केले आहे.
मागील चार-पाच वर्षांपासून चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होत आहे.चिरनेर गावात धनदांडग्यांची बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली विविध अतिक्रमणेच पुरासाठी कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांचे होणाऱ्या आर्थिक नुकसानावर याआधीच कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मातृछाया फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांची शेकडो महिलांसह भेट घेऊन संवाद साधला.दरवर्षी गावातील रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यापलीकडे कोणतेही नियोजन केले जात नाही.ग्रामपंचायत असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही मोकळे होतात.मात्र असे न करता तर पुराचा प्रश्न संकट उभे ठाकण्याआधीच मार्गी लावा असे आवाहन या महिलांनी भेटी दरम्यान ग्रामपंचायतीला केले.
यावेळी सरपंच भास्कर मोकल यांनी उपस्थित गावकरी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, महापुराचा अनुभव गाठीशी असलेल्या चिरनेरकरांचा पूर परिस्थितीचा प्रश्न सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.लवकरच चिरनेरच्या मुख्य हायवेवर पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या मोर्या बांधण्यात येणार आहेत. या मोऱ्या बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूरही झाले आहे. त्याचे काम काही दिवसातच सुरूही होईल.मात्र त्याचबरोबर विविध ठिकाणच्या मोऱ्या , नाल्यांवर जी काही पाण्याचा निचरा होण्यासाठी धनदांडग्यांची अडथळा ठरणारी अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळ पडल्यास नागरिकांसह महिलांनाही रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन सरपंच भास्कर मोकल यांनी केले.
धनदांडग्यांची नाल्यावरची अतिक्रमणे हटविण्यास कोण विरोध करेल त्यांच्या विरोधात चिरनेर गावातील महिला रस्त्यावर उतरतील अशी ग्वाही मातृछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी ग्रामपंचायतीला दिली.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , सदस्यांसह नागरिक, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.