राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात शेतीचे पीक चांगले येणार आहे तसेच खारेपाट मध्येही पीक बहरणार आहे. फक्त युरिया खताचा मारा तेवढा चांगला करा. थळमध्ये आर सी एफ चा प्रकल्प असल्याने त्याची जबाबदारी आमदार महेंद्र दळवी वर सोडून द्या. जून महिन्यात अलिबाग तालुक्यात लोकसभेला चांगले पीक येईल असे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी विश्वास बोलून दाखवला आहे.
हेमनगर कुसुंबले येथे शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थे तर्फे २५ वी रौप्य महोत्सवी तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा ऍड श्रद्धा ठाकूर, संपर्कप्रमुख प्रकाश देसाई, सरपंच रसिका केणी, काँग्रेस नेते हर्षल पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, अमित नाईक यासह विविध पक्षाचे मान्यवर यावेळी उपस्थित होते. वकील, डॉक्टर, पत्रकार यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिवनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी यावेळी प्रास्ताविक करताना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात सुनील तटकरे यांना मताधिक्य देऊ फक्त युरिया खताचा मारा करा असे मिश्किल व्यक्तव्य आपल्या मनोगतातून केले.
रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे उमेदवार आहेत. अलिबाग सह खारे पाट विभागात जून महिन्यात निवडणुकीला मताच्या माध्यमातून बहर येईल असे कणी यांनी बोलून फक्त युरिया खताचा मारा तेवढा करा असे अदिती तटकरे यांना म्हटले आहे. यावेळी ना. अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, ऍड श्रद्धा ठाकूर, प्रकाश देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.