अलिबाग : पालीतील समर्थ लिमये याने नौदलाचे चार वर्षांचे असणारे खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून रौप्य पदक पटकावले आहे. त्याची भारतीय नौदलाच्या सब लेफ्टनंटपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमधील नौदल प्रशिक्षण केंद्रात त्याने हे प्रशिक्षण पूर्ण केले असून गेल्या शनिवारी या प्रशिक्षणाचा समारोप सोहळा संपन्न झाला. भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थला रौप्य पदक प्रदान करून गौरविण्यात आले आहे. नौदलाच्या या पदावर देशसेवेसाठी रुजू होणारा सुधागड तालुक्यातील समर्थ लिमये हा बहुधा पहिला विद्यार्थी असावा.समर्थने आपले प्राथमिक शिक्षण पाली येथील जानकीबाई केशव लिमये प्राथमिक विद्यालयात घेतले. पाचवीपर्यंत त्याने पालीतील ग.बा.वडेर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर १२ वीपर्यंतचे शिक्षण त्याने सातारा सैनिक स्कूलमध्ये पूर्ण केले.भारतीय नौदलात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एनडीए व आयएनए प्रवेश पात्रता परीक्षा दिली. नौदलाचे चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण समर्थने यशस्वीरीत्या पूर्ण करून नौदलाच्या सब लेफ्टनंटपदी त्याची नियुक्ती झाली आहे. आता सलग सहा महिने नौदलाच्या बोटीवर काम करून पुढील वाटचाल यशस्वीरीत्या पूर्ण करण्याकरिता समर्थ सिद्ध झाला आहे.सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक तथा आदिवासी सेवक दादासाहेब लिमये यांचा समर्थ हा नातू आहे. ग्रामीण भागात राहून प्राप्त शिक्षणाच्या जोरावर जिद्दीने प्रयत्न केल्यास नौदलात दाखल होऊन देशसेवेकरिता सिद्ध होता येते असा आदर्श वस्तुपाठ समर्थने घालून दिला आहे.>अलिबागमध्ये साधणार संवाद‘लोकमत’च्या माध्यमातून आयोजित ‘लष्करी ध्यासाचा सिक्स पॅक’ या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून समर्थचे पिता रवींद्र लिमये यांनी रायगडमधील विद्यार्थ्यांनी लष्करी सेवेत दाखल व्हावे, असे आवाहन केले होते. त्याचबरोबर याकरिता होणाऱ्या प्रयत्नात आपले सक्रिय योगदान राहील असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते लोकमत गौरव पुरस्कार स्वीकारल्यावर बोलताना व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर सब लेफ्टनंट समर्थ लिमये पुढील आठवड्यात अलिबाग येथे येऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पालीच्या समर्थ लिमयेची भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:52 AM