कर्जत : नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली. मात्र काही रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अद्याप खडी न टाकल्याने सर्वच नगरसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
सभेच्या प्रारंभी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी सभागृहात राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे फोटो लावावेत अशी मागणी केली तर गटनेते शरद लाड यांनी माजी पंतप्रधान यांचेही फोटो लावा अशी मागणी केली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यापूर्वी मागील सभेच्या विषय पत्रिकेत विषय नंबर २९ व ३० यावर सभागृहात चर्चा झाली होती त्यावर काय कारवाई केली अशी विचारणा बळवंत घुमरे यांनी केली. त्यावर मुख्याधिकारी कोकरे यांनी जुन्या ठेकेदाराला रद्द करून नवीन ठेकेदारांची नियुक्ती केली आहे असे सांगितले. विषय पत्रिकेवर मच्छी मार्केट तात्पुरते स्थलांतरित करण्याबाबतचा विषय चर्चेला आल्यावर मुख्याधिकारी कोकरे यांनी सध्या ज्या जागेत मटण मच्छी मार्केट आहे ती जागा ग्रामपंचायतीने भाड्याने घेतली होती, जागा परत मिळण्याबाबत मालकाने न्यायालयात दावा केला आहे असे सांगितले. त्यामुळे आरक्षण विकसित करेपर्यंत मार्केट तात्पुरते स्थलांतरित करणे गरजेचे आहे. विकास आराखड्यात दहिवली येथे मटण मच्छी मार्केटसाठी आरक्षित असलेल्या शासकीय जमिनीवर करण्याबाबत सांगितले. यावेळी नितीन सावंत यांनी नगरपरिषद हद्दीत इकडे तिकडे बसणारे सर्वजण एकत्र बसवा असे सांगितले.
कर्जत नगपरिषद हद्दीतून वाहणारी उल्हास नदीलगतचा परिसर सुशोभीकरण करणे यावर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी उल्हास नदीलगतचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे पाठविण्याच्या विचाराधीन आहे असे सांगितले त्यास सर्वांनी मंजुरी दिली. महिला व बालकल्याण योजने अंतर्गत कमिटीने शिफारस केलेल्या शिफारशीनुसार गरजू महिलांसाठी व मुलींसाठी प्रशिक्षण आयोजित करणे हा विषय चर्चेला त्यावेळी मधुरा चंदन यांनी सर्वसाधारण महिलांना याची माहिती होत नाही असे सांगितले याची जाहिरात करावी तर ज्योती मेंगाळ यांनी स्थानिक प्रशिक्षणार्थींना प्रथम प्राधान्य द्यावे असे सांगितले. त्यावर नगराध्यक्षा जोशी यांनी याची फलक लावून जाहिरात करण्यात येईल तसेच स्थानिक प्रशिक्षणार्थींना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले.दहिवली परिसर तसेच मुद्रे येथील हद्दीत पावसाळे खड्डे भरण्याविषयीचा विषय आल्यावर सभेचे वातावरण थोडे तापले. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी अशोक ओसवाल, राहुल डाळींबकर, नितीन सावंत, शरद लाड, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, बळवंत घुमरे, मधुरा चंदन आदींनी सहभाग घेतला.
दहिवली जलशुद्धीकरण केंद्र आणि वंजारवाडी येथे नवीन जनरेटर खरेदीबाबतचा विषय चर्चेला आल्यावर त्या ठिकाणी किर्लोस्कर कंपनीचे जनरेटर कंपनी दरात मिळत आहेत आणि त्याबाबत कंपनीचे लोक येऊन पाहणी करून गेले आहेत असे नगराध्यक्षा जोशी यांनी सभागृहात सांगितले. त्यावर नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी एवढा खर्च जनरेटरवर होणार त्यानंतर ते चालविण्यासाठी डिझेलचा खर्च यावर देखरेख कोण करणार त्यापेक्षा या दोन्ही ठिकाणी लाइटच्या वेगवेगळे फिडर घ्यावे असे सुचवले तसा प्रस्ताव मागील सभागृहाने शासनाकडे पाठवला आहे फक्त आता त्याचा पाठपुरावा करावा लागेल असे सांगितले. यावेळी गुंडगे ठाकूरवाडी येथे शौचालय बांधकाम करण्याबाबत हा विषय चर्चेला आल्यावर उमेश गायकवाड यांनी या ठिकाणचे शौचालयाचे काम झाले आहे मग आता हा विषयाचा ठराव कसा करायचा असे सांगून आधी काम आणि नंतर सभागृहाची मंजुरी घेणे हे बरोबर नाही त्यावर नगराध्यक्षा जोशी यांनी हे काम तातडीने करणे गरजेचे होते असे सांगून वेळ मारून नेली.