अलिबागच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 510 पदे भरण्यास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:25 PM2021-05-18T17:25:40+5:302021-05-18T17:30:42+5:30
Government Medical College : अलिबाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरू होणार आहे.
रायगड : अलिबाग येथे सुरु होणाऱ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 510 पदे भरण्यास सरकारने मान्यता दिली, असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
अलिबाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरू होणार आहे. तेथील अध्यापकांची पदे तातडीने भरणे आवश्यक होते. त्यानुषंगाने संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी 29 मे 2021 च्या पत्रान्वये शिफारस केली होती. त्यानुसार एकूण 44 अध्यापकांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याचे आदेश जारी केले आहेत.
100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी एकूण 4 टप्यात गट अ ते गट-क मधील नियमित 185 पदे, विद्यार्थी पदे 121, त्याचप्रमाणे गट-क काल्पनिक पदे 139 (बाह्यस्रोताने) व गट-ड काल्पनिक पदे 65 (बाह्यस्त्रोताने) अशी एकूण 510 पदे निर्माण करण्यास शासन निर्णय 29 जानेवारी 2021 अन्वये मान्यता देण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यातील महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.