बिरवाडी : महाड एमआयडीसीमधील सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्याने मासे मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी घडली आहे. या घटनेमुळे गावांमधील बोरवेल व विहिरीमधील पिण्याचे पाणी दूषित झाले असल्याची माहिती आमशेत कोंड येथील ग्रामस्थ राजेश काशिनाथ घाग, संतोष महामुणकर यांनी दिली. महाड अतिरिक्त एमआयडीसीमधील रायगड पेट्रोलियम ते एमआयडीसी सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी बदलण्याचे काम औद्योगिक विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आले आहे. सदर कामाचा ठेका शिवरत्न कन्स्ट्रक्शन यांना देण्याला असून, काम सुरू असताना जेसीबीचे लोखंडी दात सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीला लागल्याने जलवाहिनी फुटून रासायनिक सांडपाणी इतरत्र पसरले. मात्र, या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करून सांडपाण्याचा प्रवाह थांबविण्याच्या सूचना संबंधित कारखान्यांना देण्यात आल्या आहेत, तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. या घटनेची माहिती महाड एमआयडीसीमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाला कळविण्यात आली आहे.
महाड एमआयडीसीचे सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:45 PM