धाटाव एमआयडीसीमधील कंपन्यांची मनमानी
By admin | Published: May 6, 2015 12:58 AM2015-05-06T00:58:03+5:302015-05-06T00:58:03+5:30
रायगड जिल्ह्यात कामगार मंत्रालय अंतर्गत जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत आहे. या मंडळामार्फत सर्व आस्थापनांनी सुरक्षा रक्षक नेमणे कायद्याने बंधनकारक आहे.
रोहा : रायगड जिल्ह्यात कामगार मंत्रालय अंतर्गत जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत आहे. या मंडळामार्फत सर्व आस्थापनांनी सुरक्षा रक्षक नेमणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील अनेक कंपन्या मात्र खाजगी ठेकेदारांकडून परप्रांतीय सुरक्षा रक्षक नेमून स्वत:चा मनमानीपणा करत असल्याचे दिसून येत आहे.
परिणामी धाटाव एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये काही दिवसापूर्वी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत स्थानिकांना सुरक्षा रक्षक या पदावर काम करण्यासाठी पाठविण्यात आले होते. परंतु येथील बहुतांशी कंपन्यांच्या व्यवस्थापनाने स्थानिक सुरक्षा रक्षकांना कामावर हजर करून घेतले नाही. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायदा १९८१ नुसार मंडळामार्फ त सर्व आस्थापनांना सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक आहे. मंडळामार्फत नेमण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सर्व सोयीसुविधा, पगार, भत्ते देणे आस्थापनांना बंधनकारक आहे. यामुळे धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत येणाऱ्या सुरक्षा रक्षकांना कामावर हजर करून घेत नाहीत. खाजगी कंत्राटदारांमार्फत सुरक्षा रक्षक नेमताना येथील कंपन्यांकडून स्थानिकांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यात येते. यापूर्वी रोहा येथील अॅथनिया कंपनीमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना कामावर ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. (वार्ताहर)