आगरदांडा : नाताळ सण आणि नववर्ष स्वागताचा संभाव्य जल्लोष लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता स्थानिक परिस्थितीनुसार संचारबंदी लागू केली.
जंजिरा किल्ला २५ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णयही घेतला होता. परंतु याची अंमलबजावणी पुरातत्त्व खात्याने न केल्याने शुक्रवारी सकाळपासून किल्ला पर्यटकांसाठी खुला असल्याने पर्यटक येत होते. दुपारच्या दरम्यान अचानक पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी किल्ला बंद करण्याचे आदेश दिल्याने आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.
यासंदर्भात पुरातत्त्वचे अधिकारी बजरंग येलेकर यांनी सकाळपर्यंत किल्ला बंद करण्याची ऑर्डर माझ्याकडे नव्हती. आता माझ्या हातात किल्ला बंदची ऑर्डर आहे. ताबडतोब किल्ला बंद करण्याचे आदेश मी दिले आहेत. हा किल्ला २ जानेवारी २०२१ पर्यंत बंद असणार आहे. तरी पर्यटकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी केले.