पद्मदुर्ग किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष द्यावे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:28 AM2021-03-08T01:28:54+5:302021-03-08T01:29:20+5:30
गिरीश साळी यांची मागणी
मुरुड : छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला व संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला सर्व पर्यटकांना अगदी सहज पहाता यावा यासाठी पुरातत्व खाते व महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने सयुक्तिक कार्यवाही करून किल्ल्यावर उतरणे व बोटीत चढण्यासाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जंजिरा किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला पर्यटकांना अगदी सहज पहाता आला पाहिजे, अशी जोरदार मागणी माजी नगरसेवक व समाजसेवक गिरीश साळी यांनी केली आहे.
जंजिरा किल्ला जसा पर्यटकांना पहाता येतो तशी सुविधा पद्मदुर्ग किल्लासुद्धा पहाता यावा या प्रमुख मागणीसाठी साळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वेदेखील उपस्थित होते. गिरीश साळी यांनी जंजिरा किल्ला पहाण्यासाठी वर्षाला पाच लाखपेक्षा जास्त लोक मुरुडला भेट देत असतात. पर्यटकांच्या आगमनामुळे मुरूड शहरासह असंख्य ग्रामीण भागातील लोकांना मोठा रोजगार प्राप्त होतो. हॉटेल लाॅजिंग व अल्पोहार टपऱ्या व समुद्रकिनारी असणारे घोडेवाले, वॉटर स्पोर्ट अशा विविध घटकांना रोजगार मिळवून त्यांचा विकास होतो. पर्यटकांमुळे सर्व लोकांना रोजगार मिळवून विकास होण्यास मदत झाली.
काशीद समुद्रकिनाऱ्यावर ६४ टपरीधारक व असंख्य हॉटेल व लॉजिंग यांना पर्यटकांमुळे मोठी उभारी मिळालेली आहे. मुरुड तालुक्यात आलेला पर्यटक हा टिकला पाहिजे. त्याने मुरुडमध्ये जास्तीत जास्त वस्ती केली पाहिजे. यासाठी पद्मदुर्ग किल्लासुद्धा विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्यास येथे येणारा पर्यटक जास्त दिवस वस्ती करून स्थानिकांच्या रोजगारात वृद्धी होईल. पर्यटक थांबला तरच व्यवसाय वाढ होऊन अनेक बेरोजगारांना व्यवसाय मिळून येथील जीवन सुजलाम् सुफलाम् होणार आहे. यासाठीच पद्मदुर्ग किल्ल्याकडे स्थानिक खासदार, आमदार यांनी लक्ष देऊन सर्व सुविधा मिळवून द्याव्यात, अशी आग्रही मागणी साळी यांनी केली आहे. याबाबत लवकरच पुरातत्व विभाग व मेरी टाइम बोर्ड यांच्याकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार सुरू असून, लवकरच आम्हाला यश प्राप्त होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.