महाड तालुक्यातील पडीक क्षेत्राचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:29 AM2019-08-02T01:29:26+5:302019-08-02T01:29:51+5:30
खाडीपट्ट्यातील प्रदूषणाचा फटका : वाढता खर्च, कमी उत्पन्नामुळे अनेकांची भात पिकाकडे पाठ
सिकंदर अनवारे
दासगाव : एकीकडे भात पिकाबाबत नवनवीन योजना आणि शोध पुढे येत असले तरी रायगड जिल्ह्यात केली जाणारी पारंपरिक पद्धत सोडण्यास शेतकरी तयार नाहीत, त्यातच जमीन विक्री करून मिळणारा मोठा पैसा, वाढत्या महागाईने परवडत नसलेली शेती आणि तालुक्यातील रासायनिक प्रकल्पांमुळे झालेले प्रदूषण यामुळे तालुक्यात पडीक क्षेत्राचे प्रमाण वाढतच आहे. एकीकडे कृषी विभागाच्या कागदावर मात्र कृषी क्षेत्र वाढल्याचे भासवत आहे, तर दुसरीकडे मात्र जमीन कसण्याचे सोडून देण्याचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे.
रायगड जिल्ह्याच्या ७१४८ इतक्या क्षेत्रफळापैकी जिल्ह्यात १.२४ लाख हेक्टरवर भात पीक घेतले जाते. यामध्ये शासकीय
आकडेवारीनुसार महाड तालुक्यात १२,८०० हेक्टरवर भात लागवड केली जात आहे. तर ५० हेक्टरमध्ये हरभरा, ९० हेक्टरमध्ये मूग, १७५ हेक्टरमध्ये मटकी आणि चवळीचेही उत्पादन घेतले जात आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तालुक्यातील भात पीक क्षेत्र प्रतिवर्षी घटत चालले आहे. तालुक्यातील भात जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. जमीन विक्रीतून अल्पावधीतच शेतकरी पैसा कमवत आहेत. महाड तालुक्यात जमीन विक्रीचे प्रमाण वाढले आहे. ज्यांच्याकडे मोठे क्षेत्र आहे. मात्र, भात करण्यास घरात कोणीच नाही, अशा कुटुंबांकडून जमीन विक्री केली जात आहे. नोकरीनिमित्त तरुणांची पावले मोठ्या शहराकडे वळली आहेत. अनेक जण नोकरीसाठी मुंबई, पुणे, सुरत, ठाणे, नाशिक अशा शहरात वास्तव्यास आहे. यामुळे गावात उरलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना ही शेती करणे अवघड आहे, यामुळे भात शेतीकडे दुर्लक्ष होत
आहे.
भात पीक घेताना उत्पादन कमी आणि खर्च अधिक अशी शेतकऱ्यांची गत झाली आहे. यामुळे अधिकाधिक भात शेती पडीक झाली आहे. पारंपरिक शेतीमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञान अवलंबल्यास यामध्ये बदल होऊ शकतो. भात उत्पादन घेताना शेतकºयाला खडे वेचणी, जमीन भाजणी, नांगरणी, बियाणे पेरणी, पुन्हा रोप लावणी, रोपांची लावणी करताना पुन्हा नांगरणी एवढ्या प्रक्रिया कराव्या लागत आहेत. यातील तरवा लावणे ही प्रक्रिया वेळ वाया घालवणारी आणि पर्यावरणाला बाधक आहे. मात्र, जमीन भाजणी केल्याने रोपे जोमाने येतात, असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे झाडांच्या कोवळ्या फांद्या तोडून त्या ज्या जागेत भात रोपांची निर्मिती करायची आहे त्या ठिकाणी टाकून या फांद्या पेटवून दिल्या जातात. शेत नांगरणीसाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत. मात्र, आजही तुरळक शेतकरीच याचा वापर करताना दिसत आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक उद्योगांतील प्रदूषणाचा फटका
महाड जवळ असलेल्या एमआयडीसीमुळे पडीक शेतीचे प्रमाण वाढले आहे. आधीच या परिसरातील जमीन संपादित केली आहे. यामध्ये भात जमिनीचे प्रमाणही आहे. बिरवाडी, आसनपोई, जिते, टेमघर आदी गावात प्रदूषण आणि इतर व्यवसायाकरिता जमिनी विक्री झाल्या आहेत.
या औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर खाडीपट्टा विभागात सोडले जाते. यामुळे खाडीपट्टा विभागातील खाडी शेजारील जमिनी प्रदूषित पाण्याने बाधित झाल्या आहेत. यामुळे सव, गोठे, दासगाव, जुई, रावढळ, सापे, तुडील, चिंभावे या ठिकाणी शेकडो एकर शेती पडीक राहिली आहे.
खर्च अधिक उत्पादन कमी
भात शेतीमध्ये पारंपरिक शेतीत कष्ट अधिक करावे लागत आहेत. शिवाय, मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतरामुळे मजुरांची कमतरता वाढली आहे. सध्या भात लावणीसाठी लागणारे मजूर मिळणे कठीण झाले आहे. आदिवासी बांधव यामध्ये आहेत. मात्र, त्यांचीही मजुरी वाढली आहे. भात लावणीसाठी अनेकांना आगाऊ बुकिंग करावी लागत आहे. प्रतिदिन ४०० रुपये मजुरी, जेवण, पेरणीला लागणारे बियाणे, खत यांचाही दर वाढला आहे. नांगरणीही मजुरीने करून घ्यावी लागत आहे. यामुळे भात लावणीसाठी खर्च अधिक करावा लागत आहे आणि उत्पादन हे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे.
लोकप्रतिनिधींची उदासीनता
रायगडमध्ये मोठे प्रकल्प येत आहेत. शेतकºयांच्या जमिनी याकरिता सरकार थेट भूसंपादन प्रक्रियेतून घेत आहे. महाड तालुक्यातही अशा प्रकारे जमिनी घेणे सुरूच आहे. प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या जात आहेत. मात्र, प्रकल्प अर्धवट सोडले जात आहेत यामुळे भात पीक पडीक राहत आहे. शेतकºयांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी गप्प आहेत. अवकाळी पावसात शेतकºयांच्या भाताचे नुकसान होते. मात्र, एकही आमदार विधानसभेत भाताला दर मिळावा म्हणून भांडत नाही. भातावर आधारित प्रकल्प रायगडमध्ये उभे राहिले नाहीत. कृषी विभाग प्रतिवर्षी कृषी क्षेत्र वाढीस लागल्याचे सांगत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील उदासीन भूमिकेत आहे. महाडमधून केवळ करवसुली जोरात केली जात आहे. मात्र, शेतकºयांच्या मालाला बाजारपेठ किंवा जागा उपलब्ध करून दिली जात नाही.
दासगाव शेजारी सावित्री नदी वाहते. गेल्या कित्येक पिढ्या या नदीच्या पाण्यावर भात शेती आणि कडधान्य काढायच्या. मात्र, प्रदूषित पाण्यामुळे या भागात शेती करणे सोडून दिले आणि या शेतामध्ये कशेळ आणि अन्य वनस्पती वाढल्या गेल्या आहेत. शिवाय या जमिनीचा कसदेखील राहिलेला नाही परिणामी, शेती पडीक राहिली आहे.
- शकील अनवारे, शेतकरी
ग्रामीण भागात शेती मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मात्र, तरुण वर्ग नोकरीनिमित्त शहरात गेला आणि या शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे. वाढती महागाई, मजुरांची टंचाई आणि दूषित पाणी यामुळे भात शेती न परवडणारी झाली आहे. याचे रूपांतर पडीक शेतीत झाले आहे.
- संजय गोविंद बारगीर, शेतकरी