लोहारमाळ येथे सशस्त्र दरोडा
By admin | Published: November 27, 2015 02:17 AM2015-11-27T02:17:39+5:302015-11-27T02:17:39+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहरमाळ येथे बुधवारी रात्री सव्वा दहा वाजल्याच्या सुमारास एका घरावर सशस्त्र दरोडा घालून घरातील तीन लाखांचा ऐवज
महाड/पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहरमाळ येथे बुधवारी रात्री सव्वा दहा वाजल्याच्या सुमारास एका घरावर सशस्त्र दरोडा घालून घरातील तीन लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर फरार झाले. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. घरातील अन्य दोघांनाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली. या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून गुरु वारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहम्मद सुएझ हक यांनी घटनास्थळी भेट दिली.
महामार्गापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या लोहारमाळ पवारवाडी येथील संदीप नरे यांच्या घरावर हा दरोडा पडला. नरे यांच्या भातगिरणी शेजारीच त्यांचे घर असून भात भरडायचा असल्याचे कारण सांगून एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराकडे आली व संदीप नरे यांच्या आजीने दरवाजा उघडला. त्यावेळी त्या व्यक्तीने त्यांच्याकडे पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. त्या पाणी आणण्यासाठी घरात गेल्या त्यावेळी ६ जण घरात घुसले व त्यांनी संदीप नरे व त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरु वात केली. दागिने व पैशांची त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली, त्यावेळी संदीप यांच्या पत्नी समीधा यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी तिच्या डोक्यात लोखंडी शिगेचा प्रहार करून तिला जखमी केले. त्यावेळी कपाटातील सोन्याचे दागिने घेवून चोरटे पसार झाले. नरे यांच्या घरातील आरडाओरड ऐकून शेजारील ग्रामस्थांनी नरे यांच्या घराकडे धाव घेतली, मात्र अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी महामार्गाच्या दिशेने पलायन केले.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या समीधा नरे यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या दरोड्यात घरातील सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजार रूपये रोख रक्कम व तीन मोबाइल असा तीन ते साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेल्याची फिर्याद पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली आहे. दरोड्यांचे सत्र उत्तर रायगडकडून आता दक्षिण रायगडमध्ये सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडालेली आहे. (वार्ताहर)