‘रायगड पॅटर्न’ रोखण्याचे सेना-भाजपसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 02:39 AM2019-08-04T02:39:55+5:302019-08-04T02:40:14+5:30
वंचितच्या ताकदीचे स्वरूप स्पष्ट होणार; मतदारसंघ वाटपावरून संघर्षाची शक्यता, उमेदवार बदलल्यास बंडखोरी, फोडाफोडीची चिन्हे
- आविष्कार देसाई
अलिबाग : राज्यात लागू होणारे राजकीय नियम, बंधने ही रायगड जिल्ह्यातील राजकारणाने कधीच अंगाला चिकटून घेतलेली नाहीत. आपापली सुभेदारी राखण्यासाठी जिल्ह्यातील धुरंदर राजकारण्यांनी नेहमीच सोयीचे राजकारण केले आहे. त्यामुळेच ते रायगडच्या रयतेवर बिनदिक्कत राज्य करत आहेत.
या जिल्ह्यात सध्या शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन आमदार आणि भाजपचा एक आमदार आहे. सात विधानसभा मतदारसंघांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी यांची युती आहे, तर काही ठिकाणी शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या बाहूंना बळ दिले जाऊ शकते. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युती झाल्यास भाजप अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल या चार जागांवर दावा करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याभोवतीच रायगडचे राजकारण फिरते. पूर्वी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणारे हे नेते गेल्या पाच वर्षांपासून रायगडावर राज्य या एकाच राजकीय सूत्रानुसार राजकारण खेळत आहेत. त्यांनी सर्वच निवडणुका एकत्र लढण्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे हा ‘रायगड पॅटर्न’ तोडण्यासाठी शिवसेना- भाजपला प्रयत्न करावे लागतील. यात उमेदवार बदलण्याचा निर्णय झाल्यास युती किंवा आघाडीला बंडखोरी, फोडाफोडीचा सामना करावा लागू शकतो.
अलिबाग विधानसभा मतदारसंघ शेकापच्या ताब्यात आहे. जयंत त्याचे पाटील यांचे बंधू सुभाष पाटील हे प्रतिनिधित्व करतात. पक्ष त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. शिवसेनेकडून महेंद्र दळवी आणि सुरेंद्र म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर आजारपणामुळे निवडणुकीत उभे राहणार नाहीत, असे सांगितले जाते. त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा राजेंद्र व सून श्रद्धा यांचे नाव चर्चेत आहे. जागावाटपात अलिबागची जागा भाजपच्या पदरात पडल्यास त्यांच्याकडे अॅड. महेश मोहिते यांच्याशिवाय चेहरा नाही.
पेण मतदारसंघामध्ये भाजपकडून काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे माजी मंत्री रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्याविरोधात शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांच्यात सामना रंगेल, असे दिसते.
श्रीवर्धन मतदारसंघातून सध्या सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे आमदार आहे. सुनील तटकरे यांची कन्या अदिती या सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. त्यांना श्रीवर्धन मतदारसंघातून उतरवण्यात येणार असल्याने अवधूत यांचा पत्ता कापला जाणार असल्याने ते सेनेशी जवळीक वाढवत आहेत. शिवसेनेकडून रवी मुंढे यांचे नाव चर्चेत आहे; परंतु अवधूत यांना जवळ ठेवणे शिवसेनेच्या फायद्याचे असल्याने अवधूत यांच्या पत्नी अॅड. रेवती यांना मैदानात उतरवून महिलेविरोधात महिला अशी लढत होऊ शकते का, अशी चाचपणी सुरू आहे.
महाड विधानसभा मतदारसंघावरील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचे वर्चस्व पाहता पक्षाकडून त्यांनाच संधी मिळू शकते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप हे गेल्या पाच वर्षांपासून तयारी करत आहेत. महाडमध्ये काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाली तर शिवसेनेला आव्हान मिळू शकते.
कर्जत मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड तटकरे यांच्यासोबत आहेत. तटकरे शरद पवार यांचे निकटवर्ती असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. त्यांच्या विरोधात भाजपचे देवेंद्र साटम, वसंत भोईर अशी लढत होऊ शकते अथवा शिवसेनेकडून संतोष भोईर, महेंद्र थोरवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, हणमंत पिंगळे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे.
उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांनाच शिवसेना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. त्याचवेळी भाजपकडून महेश बालदी यांचे नाव त्यांचे समर्थक पुढे रेटत आहेत. शेकापकडून या ठिकाणी जे. एम. म्हात्रे किंवा त्यांचा मुलगा प्रीतम म्हात्रे यांचे नाव चर्चेत आहे.
पनवेलमधून आमदार म्हणून निवडून गेलेले प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात शेकापला तगडा उमेदवार द्यावा लागेल. शेकापचे बाळाराम पाटील विधान परिषदेवर, तर माजी आमदार विवेक पाटील हे आजारपणामुळे राजकारणापासून अलिप्त आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि लक्ष्मण माने यांच्यात मतभेद झाले आहेत. माने यांनी काही दिवसांपूर्वी शेकापच्या व्यासपीठावरून सर्वपक्षीय आघाडीचे आवाहन केले होते. आघाडी न झाल्यास वंचित बहुजन आघाडी सर्व जागा लढवणार असल्याच्या चर्चेमुळे येथील लढत सध्यापेक्षा वेगळी होईल. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने आजवर निवडणूक लढवलेली नसल्याने त्यांची नेमकी किती ताकद आहे, हे या निवडणुकीतच स्पष्ट होईल.
गेल्या निवडणुकीवर दृष्टिक्षेप
सर्वांत मोठा विजय :
महाड मतदारसंघ : भरत गोगावले (शिवसेना) मते - ९४,४०८ फरक - २१,२५६
सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : श्रीवर्धन मतदारसंघ - रवी मुंढे (शिवसेना) मते - ६०,९६१ (विजयी उमेदवार : अवधूत तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - मतांचा फरक - ७७)
सध्याचे पक्षीय बलाबल
शेकाप - २ राष्ट्रवादी - २ शिवसेना - २ भाजप - १