रायगड : अर्णब गोस्वामी यांच्या विराेधात जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आजपासून न्यायालय सुट्टीवर गेल्याने आता ५ डिसेंबर तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आराेपी अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना बुधवार ४ नाेव्हेंबर राेजी अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. सुमारे आठ तास या खटल्याची सुनवाणी सुरू हाेती. दाेन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आराेपींची १४ दिवसांसाठी न्यायालयीन काेठडीत रवानगी केली हाेती. रायगड पाेलिसांना गाेस्वामी यांची पोलीस काेठडी पाहिजे हाेती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले. गाेस्वामी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली, मात्र अलिबागच्या न्यायालयातूनच न्याय मिळावा, असे उच्च न्यायालयाने सांगत गाेस्वामी यांचा अर्ज फेटाळून लावला हाेता. गाेस्वामी यांच्यासह सारडा आणि शेख यांना अलिबाग नगरपालिकेच्या शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले हाेते.
जिल्हा सत्र न्यायालयातील रायगड पाेलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली हाेती. दिवाळीच्या सुट्टीमुळे न्यायालयाने निकाल राखून ठेवला हाेता. न्यायालय २३ नाेव्हेंबर राेजी निकाल देण्याची शक्यता हाेती. मात्र आज न्यायालय सुट्टीवर गेले आहे. त्यामुळे आता ५ डिसेंबर तारीख दिली आहे.- ॲड. निहा राऊत, आराेपीच्या वकील