Arnab Goswami: अर्णब गाेस्वामी प्रकरणी २३ नाेव्हेंबरला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 01:55 AM2020-11-13T01:55:19+5:302020-11-13T06:56:17+5:30
आराेपींना पाेलीस काेठडी देण्यात यावी तसेच आराेपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारपक्षाने केला हाेता.
रायगड : अर्णब गाेस्वामी यांना सर्वाेच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निकालाची सुस्पष्ट प्रत प्राप्त हाेत नाही ताेपर्यंत गाेस्वामी यांच्या जिल्हा सत्र न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावर आणि अन्य आराेपींच्या जामीन अर्जावर निकाल देऊ नये, अशी विनंती आराेपींच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयाने निकाल राखून ठेवत यावर २३ नाेव्हेंबर तारीख दिली आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना रायगड पाेलिसांनी ४ नाेव्हेंबर राेजी अटक केली हाेती. अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी आराेपींना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी दिली हाेती. याविराेधात रायगड पाेलीस आणि सरकारने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली हाेती.
आराेपींना पाेलीस काेठडी देण्यात यावी तसेच आराेपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारपक्षाने केला हाेता. त्यानंतर गाेस्वामी यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते, मात्र गाेस्वामी यांना तेथील दरवाजे बंद झाले हाेते. गाेस्वामी यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव घेत हंगामी जामीन मिळवला हाेता. गाेस्वामी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे, तर फिराेज शेख आणि नितेश सारडा यांनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज कायम ठेवला आहे. त्यावर २३ नाेव्हेंबर राेजी सुनावणी हाेणार आहे