न्यायालयीन काेठडीत मिळतेय अर्णब गाेस्वामी यांना सामान्य वागणूक, साधेच जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 01:04 AM2020-11-06T01:04:27+5:302020-11-06T01:04:51+5:30
Arnab Goswami : कारागृहाच्या नियमांनुसारच गाेस्वामी यांना वागणूक दिली जात आहे. काेविडच्या नियमांमुळे नातेवाइकांच्या मुलाखतीही बंद केल्या आहेत.
रायगड : आलिशान स्टुडिओमध्ये बसून ‘पुछता है भारत’ असा सवाल उपस्थित करणाऱ्या अर्णब गाेस्वामी यांना सध्या न्यायालयीन काेठडीची हवा खावी लागत आहे. काेविडच्या पार्श्वभूमीवर येथील नगर परिषदेच्या मराठी शाळेमध्ये उपकारागृह निर्माण केले आहे. त्यातील एका खाेलीमध्ये गाेस्वामी यांना राहावे लागत आहे.
नियमानुसार आराेपींना जी वागणूक दिली जाते तीच वागणूक गाेस्वामी यांना मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारागृहाच्या नियमांनुसारच गाेस्वामी यांना वागणूक दिली जात आहे. काेविडच्या नियमांमुळे नातेवाइकांच्या मुलाखतीही बंद केल्या आहेत. त्यामुळे गाेस्वामी यांना नातेवाइकांना भेटता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
याच कारागृहामध्ये अन्य गुन्ह्यांतील ४२ आराेपींना ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गाेस्वामी यांच्याजवळ माेबाइलही देण्यात आलेला नाही. त्यामुळे नेहमीच जगाच्या संपर्कात असलेल्या गाेस्वामी यांचा संपर्क तुटल्याचे बाेलले जाते. त्यांना बाहेरूनदेखील जेवण देण्याला काेविडचा नियम आडवा आला.
जेवणामध्ये डाळ, भात, भाजी, चपाती असे साधेच जेवण असते, त्याचप्रमाणे नियमानुसार जे पाणी अन्य आराेपींना पिण्यासाठी दिले जाते तेच पाणी गाेस्वामी यांना दिले जात आहे. एक काॅट, ट्युबलाईट आणि डाेक्यावर गरगरणारा पंखा अशा सुविधा असल्याचेही सूत्रांनी सांगितले. गाेस्वामी यांच्या न्यायालयीन काेठडीची आजची दुसरी रात्र आहे.