चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासाठी बंदोबस्त; २१७ पोलीस अधिकारी, कर्मचारी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:13 PM2020-08-28T23:13:46+5:302020-08-28T23:13:56+5:30
समस्या सोडविण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर तैनात
निखिल म्हात्रे
अलिबाग : गौरी-गणपती विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. परतीच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्यासाठी २९ पर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा एकूण २१७ जणांचा बंदोबस्त मुंबई-गोवा महामार्गावर ठेण्यात आला आहे. त्यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्या गणपतीचे दर्शनही घेता आले नाही. मात्र, नागरिकांची सेवा हाच गणेशाचा मोठा आशीर्वाद असल्याचे काही पोलीस कर्मचाºयांनी सांगितले.
जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने, गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात पोलिसांनी पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर या ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास यावेळी प्रवाशांना जाणवला नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डेही भरण्यात आल्याने प्रवास सुखकारक झाला आहे.
नियुक्त पोलीस
पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर, कोकणातून ठाणे, मुंबई, पुण्याकडे परतणाºया भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांनी विशेष खबरदारी घेत, महत्त्वाच्या स्पॉटवर ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, ६ पोलीस निरीक्षक, १३ सह.पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, २१७ पोलीस कर्मचारी, तसेच पोलीस स्टेशनअंतर्गत स्थानिक स्तरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम : गणपती विसर्जनानंतर गणेशभक्त मुंबई-पुण्याकडे परतणार असल्याने, रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली आहे, वाहतूककोंडी होऊन नये, याकरिता माणगावमधून काढलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा व या गणेशभक्तांनी नियमांचे पालन करीत गाडी चालविल्यास प्रवास सुखकर होणार, हे निश्चित अशी प्रतिक्रि या वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आर. पी शिंदे यांनी दिली.