कर्नाटकमधून फरार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:43 AM2019-05-19T04:43:23+5:302019-05-19T04:43:25+5:30
सागर पाटील खून प्रकरण । २७ मेपर्यंत पोलीस कोठडीचे न्यायालयाचे आदेश
अलिबाग : कुरुळ येथील दत्त टेकडी परिसरात झालेल्या सागर पाटील खुन प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र प्रकाश मगर व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण या दोघांना गाणगापूर (कर्नाटक) येथे अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी जितेंद्र मगर यांचा मोठा भाऊ गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेंद्र मगर यांचे वडिलोपार्जित मिळकतीवरून वाद होते. आरोपी राजेंद्र याने त्याच्या कटात आरोपी नीलेश वाघमारे (रा. गोविंद बंदर, अलिबाग) व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण (रा. हवेली, पुणे) यांना सामील करून घेतले. १ एप्रिल रोजी मध्यरात्री जितेंद्र हे मित्रांसह कुरुळ-दत्तटेकडी येथून कुरुळ गावाकडे येत असताना, टेकडीच्या पायथ्याशी दबा धरून बसलेल्या तिघांनी गोळीबार करून सागर पाटील यांचा खून केला. तर यात गौरव चंद्रकांत भगत (रा. कुरुळ) यांस जखमी केले होते. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नीलेश दशरथ वाघमारे यास पकडण्यात पोलिसांना तत्काळ यश आले होते; परंतु राजेंद्र प्रकाश मगर व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण हे फरार झाले होते. या दोघांचा पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे शोध घेण्यात आला. हे दोघेही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नाव धारण करून वावरत होते. या तपासादरम्यान पथकास मिळालेल्या माहितीनुसार यातील या दोघा आरोपींना गाणगापूर (कर्नाटक) येथे मोठ्या अटक करण्यात आली. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व अलिबाग पोलीस यांच्या संयुक्त शोधपथकाने ही कारवाई के ल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांनी दिली आहे.
दोघांनाही पोलीस कोठडी
राजेंद्र मगर व समीर चव्हाण या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही २७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे हे करीत आहेत.