फसवणूक करून एटीएममधील पैसे काढणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:39 AM2021-03-10T01:39:43+5:302021-03-10T01:39:58+5:30
१५ फेब्रुवारी रोजी एटीएममध्ये पैसे काढते वेळी मदत केलेल्या व्यक्तीने त्यांचे एटीएम बदलून त्यातून पैसे काढल्याचे चंदने यांच्या लक्षात आले. त्याप्रकरणी चंदने यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : एका व्यक्तीचे एटीएम घेऊन त्याच्या पिन कोडची माहिती घेऊन या व्यक्तीच्या खात्यातील पैसे एटीएमच्या माध्यमातून काढून त्याची फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १५ फेब्रुवारी रोजी कर्जत शहरातील प्रकाश चंदने कर्जतमधील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधील मशीनमध्ये पैसे काढण्याकरिता गेले असता एटीएममध्ये त्यांच्या पाठीमागे असलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएमची अदलाबदल करून एटीएम कार्डचा पिन नंबर घेऊन तिथून निघून गेले होते. कालांतराने प्रकाश चंदने यांच्या खात्यामधून वेळोवेळी एकूण ७६ हजार ४०० रुपये डेबिट झाल्याचे मेसेज मोबाईलवर आल्याने त्यांना समजले, त्यावेळी आपल्या जवळ असलेले एटीएम कार्ड आपले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
१५ फेब्रुवारी रोजी एटीएममध्ये पैसे काढते वेळी मदत केलेल्या व्यक्तीने त्यांचे एटीएम बदलून त्यातून पैसे काढल्याचे चंदने यांच्या लक्षात आले. त्याप्रकरणी चंदने यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे करीत होते. तपास करीत असताना आरोपी चंद्रशेखर कुमार प्रदीप सहानी याला उस्मानाबाद येथून ताब्यात घेतले असता गुन्हा केल्याचे कबूल करून त्याचा साथीदार प्रमोद सगीचद सहानी यास तळेगाव दाभाडे एमआयडीसी, पुणे येथून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले
आहे.
आरोपींनी रायगड जिल्ह्यात अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुबे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस शिपाई भूषण चौधरी, पोलीस शिपाई अश्रुबा बेंद्रे यांनी तपास केला.