पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:37 PM2020-06-01T23:37:54+5:302020-06-01T23:38:39+5:30

शेतीच्या कामांना वेग : उकाड्यातून सुटका; दहा-बारा दिवसांत भात पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता

With the arrival of rain, Baliraja was relieved | पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

Next

अलिबाग : मागील दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात उकाडा वाढल्यानंतर सोमवारी पहाटे पहिला पाऊस बरसला. उकाड्याने अलिबागसह रायगडकर हैराण झाले होते. सोमवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा खूश झाला आहे. साधारणत: १० वर्षांनी जूनच्या १ तारखेलाच पावसाने हजेरी लावल्याचे बोलले जात आहे.
पावसाचे आगमन होताच शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. यंदाच्या कडक उन्हामुळे सर्व जण हैराण झाले होते. त्यामुळे सर्वांनाच पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण व्हायचे, परंतु पाऊस काही पडत नव्हता. अखेर सोमवारी पावसाने हजेरी लावली.


जिल्ह्यातील काही भागांत सोमवारी पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसासोबत आलेल्या वाऱ्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले होते. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांना आता वेग आला असून येत्या १० ते १२ दिवसांत भाताच्या पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


जून महिन्यात पेरणीकामे पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या हाताला धान्योत्पादन येऊ शकते. शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून ट्रॅक्टरने व बैलाच्या साहाय्याने नांगरणी, कुळवण करून शेतामधील तणाने व्यापलेल्या जमिनीची वेचणी करण्यात तो मग्न आहे.


मुरूड शहरामध्ये पावसाचा शिडकावा
च्आगरदांडा : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला होता, त्यामुळे नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते.
च्सोमवारी दुपारी पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुरूडकर सुखावले.
च्भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. ३ जून आणि ४ जून रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रेड आणि आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाच्या तुरळक सरी
च्रेवदंडा : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असतानाच सोमवारी पहाटे पावसाचा शिडकावा सुरू झाला आणि मान्सूनपूर्व पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र यामुळे आंबा विक्री करण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील महिलांची गैरसोय झाली.
च्बाजारात प्लॅस्टिक कापड खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. तर काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थ हैराण झाले. बळीराजा मशागतीची कामे वेगाने करताना दिसत आहे.


विजांचा कडकडाट
उरण : कोरोना आणि लॉकडाउनमध्येच उकाड्याने घामाघूम झालेल्या उरणवासीयांना सोमवारी सकाळीच विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला आहे. विजेच्या कडकडाटाने मध्यरात्रीपासून उरणकरांची झोप उडाली होती. मात्र पावसाच्या शिडकाव्याने काही प्रमाणात का होईना गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना व उकाड्याने हैराण झालेल्या उरणवासीयांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. तर या हलक्या सरींनी बळीराजाला शेतीच्या कामांसाठी जागा होण्याचा इशाराही दिला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते.

चक्रीवादळाचा तडाखा

माणगाव : मान्सूनपूर्व पावसासोबतच वेगाने घोंगावलेल्या चक्रीवादळामुळे निजामपूर शहर आणि ग्रामीण भागातही घरांच्या छपराची पडझड होऊन लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. निजामपूर शहरातील बस स्थानक, समर्थनगर या ठिकाणी विद्युतवाहक तारा तुटून जमिनीवर पडल्या. महावितरण कर्मचाºयांनी दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेतल्याने जीवितहानी टळली.
२लॉकडाउनमधून नुकत्याच सावरलेल्या मुख्य बाजारपेठेतील दुकानांचे पत्रे, लोखंडी पाइप उडाल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या इमारतीचे छप्पर तुटून पार्किंगमधील चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे.
३ग्रामीण भागातील उधळेकोंड, घोडशेतवाडी, चाच, केळगण या गावांमध्ये सिमेंट पत्रे तुटून घरांच्या भिंतींना भेगा पडल्या. अचानक उद्भवलेल्या चक्रीवादळामुळे निजामपूर बाजारपेठेसह खेडोपाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनाच्या महामारीत खंबीरपणे लढत असलेला सर्वसामान्य नागरिक या नैसर्गिक आपत्तीपुढे मात्र हतबल झाला असून, शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: With the arrival of rain, Baliraja was relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.