रांगोळीतून साकारली कलाकृती, काळ भैरव उत्सवात रांगोळी प्रदर्शन
By राजेश भोस्तेकर | Published: December 5, 2023 07:40 PM2023-12-05T19:40:01+5:302023-12-05T19:40:12+5:30
अभिनेते सतीश पुळेकर यांनी केले उद्घाटन
अलिबाग: ५ डिसेंबर रोजी काळभैरव जयंती साजरी झाली. रेवदंडा येथील मंदिरात मोठ्या उत्साहात काळभैरव उत्सव ग्रामस्थांनी साजरा केला. काळभैरव उत्सव निमित्त मंडळातर्फे रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी सिने सृष्टीतील जेष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन केले. रेवदंडा गावातील कलाकारांनी रांगोळीतून सादर केलेल्या कलाकृतीचे अभिनेते सतीश पुळेकर यांनी स्तुती केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद गोंधळी, उपसरपंच मंदा बळी, मंडळाचे अध्यक्ष वैभव नाईक ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते.
रेवदंडा येथील गोळा स्टॉप येथे प्रसिद्ध काळभैरव मंदिर आहे. यंदा काळभैरव उत्सवास ५५ वर्ष पूर्ण होत आहेत. काळभैरव मित्र मंडळातर्फे जयंती उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. हजारो भाविक या उत्साहाला आणि महाप्रसाद घेण्यास आवर्जून येत असतात. गावातील कलाकारांना आपल्या कलेला वाव मिळावा म्हणून दरवर्षी रांगोळी प्रदर्शन मंडळातर्फे आयोजित केले जाते. यंदा अभिनेते सतीश पुळेकर हे रेवदंडा येथे फिरण्यास आले असता त्यांनी काळभैरव उत्सवाला उपस्थिती दर्शविली.
रांगोळीच्या कलेतून कलाकारांनी आकर्षक कलाकृती सादर केली आहे. क्रिकेटर विराट कोहली, सिंधुताई, वारकरी, बाबा महाराज सातारकर, छत्रपती शिवाजी महाराज, पाण्यात भिजणारे मुल, महादेव पिंड, निसर्ग चित्र अशी कलाकृती रांगोळी मधून कलाकारांनी साकारली आहे. काळभैरव यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनीही रांगोळी प्रदर्शनाचा आस्वाद घेतला.