रायगड – मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी पनवेल येथे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकारवर टीका केली. त्याचसोबत इथं मी हिरवा झेंडा दाखवायला आलो. गेल्या १७ वर्षापासून हा महामार्ग रखडलाय त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करण्याचे आदेश राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिले. पनवेलमधील राज ठाकरेंचे भाषण संपताच दुसऱ्या क्षणी पेणजवळ मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावर आंदोलन सुरू केले.
मनसेचे स्थानिक नेते जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी प्रतिकात्मक म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मनसेच्या आंदोलनामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूकही खोळंबली होती. या आंदोलनाबाबत जितेंद्र पाटील म्हणाले की, रस्त्यावर पडलेले खड्डे याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही वृक्षारोपण करत आहोत. खड्ड्यांमुळे जो त्रास लोकांना होतोय त्यासाठी सरकार आणि ठेकेदारच जबाबदार आहेत. काही मिनिटांपूर्वी राज ठाकरेंनी भाषण केले. त्यात खड्ड्यांचा ज्वलंत प्रश्न पुढे आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी जिथे जिथे खड्डे असतील तिथे आम्ही वृक्ष लावणार आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते असा इशाराही मनसे नेते जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
पनवेल इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर परखड भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई गोवा महामार्ग व्हावा ह्यासाठी माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, हे काम वेळेत होईल ह्यासाठी लक्ष ठेवा, काम करा. त्यासाठी आंदोलन करायची वेळ आली तर असं आंदोलन करा की सरकारला भविष्यात आपल्या आंदोलनाची आठवण आणि दहशत राहील. मुंबई गोवा रस्ता झाल्यावर पण कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे बघा. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाचं इतकं अद्भुत दान आपल्या पदरात पडलं आहे त्याचा नाश करू देऊ नका असा आदेशच कार्यकर्त्यांना दिला.