निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोशल मिडीयावर जिल्ह्यातील पोलीस सायबर सेल आणि मिडीया सेल च्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे. सोशल मिडीया (व्हॉट्सअप) वर लोकसभा 2024 च्या अनुषंगाने आक्षेपार्ह व दोन समाजात तेढ निर्माण करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याऱ्या अज्ञात ईसमावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुक 2024 चे पार्श्वभुमीवर रायगड जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मिडीया मॉनेटरिंग करण्याकरीता सोशल मिडीया सेल स्थापन करण्यात आलेला असुन त्याव्दारे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम व टियूटर या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे नेत्यांनी केलली भाषणे व त्या अनुषंगाने लोकांनी केलेली टीका टिप्पणी तसेच वॉट्सप ग्रुपवर लोकांनी व्हिडीओ,ऑडीओ व इतर प्रकारे केलेल्या पोस्ट या ऐकुन पाहुन व वाचन करून त्या मधील आक्षेपाहर्य पोस्ट मिळून आल्यास त्यावर योग्यती कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोशल मिडीया लॅबब्दारे मॉनिटरींग करण्यात येते.
4 मे रोजी सायं. 5 वाजण्याचे सुमारास सोशल मिडीया मॉनेटरिंग करीत असताना गोपनिय सुत्राकडून एक ऑडीओ क्लीप आढळून आली. या ऑडीओ क्लीप मध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य असल्याचे आढळून आले. या ऑडीओ क्लीप मधील आवाज विशिष्ट समाजाला भडकावुन सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणारे आहे. सदर अज्ञात इसमाविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 505(2) सह लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 125 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे यांचेकडुन सुरू करण्यात आलेला आहे. सोशल मिडीयावर समाजात तेढ निर्माण करण्याऱ्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट करू नये, असे निर्देशनास आल्यास संबंधीत व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.