माणगावमधील नांदवी येथील आश्रमशाळेला हवी शासकीय जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 03:00 AM2019-11-25T03:00:46+5:302019-11-25T03:04:32+5:30

माणगाव तालुक्यातील नांदवी येथील आदिवासी आश्रमशाळेला शासकीय इमारत नाही. शाळा मंजूर झाल्यापासून एका खासगी मालकीच्या इमारतीमध्ये ती भरवली जात आहे.

The Ashram Shala at Nandavi in Mangaon is the place of government | माणगावमधील नांदवी येथील आश्रमशाळेला हवी शासकीय जागा

माणगावमधील नांदवी येथील आश्रमशाळेला हवी शासकीय जागा

googlenewsNext

- गिरीश गोरेगावकर
माणगाव - तालुक्यातील नांदवी येथील आदिवासी आश्रमशाळेला शासकीय इमारत नाही. शाळा मंजूर झाल्यापासून एका खासगी मालकीच्या इमारतीमध्ये ती भरवली जात आहे. गेली अनेक वर्षे महसूल विभागाकडे जागेबाबत मागणी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. किमान पाच एकर जमीन या आदिवासी आश्रमशाळेकरिता अपेक्षित असून, शासकीय जागा मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी, माणगाव तहसील यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत माणगाव तालुक्यातील नांदवी आश्रमशाळेला २००६ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानुसार या ठिकाणी माणगाव, गोरेगाव, महाड या परिसरातील आदिवासी मुलांना शिक्षण आणि राहण्याची सुविधा असलेली निवासी शाळा सुरू करण्यात आली. भाडेतत्त्वावर एक इमारत घेऊन २००६ पासून ही शाळा सुरू करण्यात आली.

वीर, टोळ, संदेरी, श्रीवर्धन आणि महाडमधील जवळपास ९६ आदिवासी विद्यार्थी सध्या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. यामध्ये ४४ मुली आणि ५२ मुलांचा समावेश आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असून, खासगी इमारतीमध्ये मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. सर्व शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी राबवले जात असले तरी क्रीडांगण, संगणककक्ष आदी सुविधांचा या ठिकाणी अभाव आहे. ज्या इमारतीमध्ये ही निवासी शाळा सुरू आहे, त्या ठिकाणी क्रीडांगणाची कमतरता आहे. गेली १३ वर्षे या निवासी शाळेला शासकीय जागा मिळवून देण्यात महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.

जवळपास प्रतिमहिना ३१ हजार रुपये भाडे या खासगी इमारतीला मोजावे लागत आहेत. ज्या ठिकाणी निवासी शाळा आहे ते गाव माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे गाव आहे. या ठिकाणी गावात शासकीय उपक्रम आणि योजना राबवल्या गेल्या. मात्र, या योजनांकडे त्यानंतर दुर्लक्ष झाले आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेणकडून जागा मिळावी म्हणून माणगाव तहसील कार्यालयात पाठपुरावा करण्यात आला आहे. हा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचला, तरी माणगावमध्ये जागा उपलब्ध झालेली नाही.

कर्मचारी संख्या अपुरीच
नांदवी येथील आदिवासी आश्रमशाळेत पहिली ते सातवीपर्यंत ९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा मंजुरीनंतर या ठिकाणी १८ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, यामध्येही कर्मचारी संख्या अपूर्ण आहे. येथील मुख्याध्यापक हे पदही रिक्त आहे. प्राथमिक शिक्षक सहा पदे मंजूर असली, तरी प्रत्यक्षात चार शिक्षकपदे रिक्त आहेत. पुरुष अधीक्षकपदही रिक्त राहिले आहे. सध्या असलेले शिक्षकच ही शाळा सांभाळण्याचे काम करत आहेत.

जावळी येथे शाळेची मागणी
माणगाव तालुक्यातील जावळी येथे समाजकल्याण विभागाची आश्रमशाळा आहे. मध्यंतरी या ठिकाणी पटसंख्या घसरली होती, यामुळे या इमारतीमध्ये ही निवासी शाळा भरण्यास परवानगी मिळावी म्हणून मागणी करण्यात आली होती. या मागणीला समाज कल्याण विभागाने नकार देत या ठिकाणी पुन्हा शाळा सुरू केल्याची माहिती प्रभारी मुख्याध्यापिका व्ही. बी. कानवटे यांनी दिली.
 

Web Title: The Ashram Shala at Nandavi in Mangaon is the place of government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.