विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 07:18 AM2024-10-26T07:18:33+5:302024-10-26T07:19:16+5:30
टेम्पोमधून चांदीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, खोपोली: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी सुरू असतानाच रायगड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाक्यावर अंदाजे १० कोटी रुपयांची चांदी जप्त केली.
टेम्पोमधून चांदीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार, पोलिस निरीक्षक शीतल राऊत, सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास भोर आदींच्या पथकाने सापळा रचला होता.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी टेम्पो आला असता पोलिसांनी तो ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यात तब्बल दहा कोटी रुपये किंमतीची चांदी असल्याचे उघड झाले. संबंधित टेम्पो एका कुरिअर कंपनीचा आहे. खालापूर पोलिस स्टेशनात कंपनीच्या कागदपत्रांची छाननी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.