कर्जत : मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची त्यांना हा निधी वरदान ठरत आहे. याबाबत सुमारे साडेचार वर्षांत १५०० कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे तत्कालीन कक्षप्रमुख ओमप्रकाश शेट्ये यांनी माथेरानमधील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
राज्यातील आर्थिक व दुर्बल घटकांसाठी विविध प्रकारच्या आजारावर मदत मिळावी, याकरिता तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातून सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री साहाय्यता निधीची स्थापना करण्यात आली. ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा रुग्णांना ही मदत दिली जाते. ही मदत २५ हजार ते पाच लाखांपर्यंत आजाराच्या स्वरूपानुसार दिली जाते. किडनी, कॅन्सर, हृदय शस्त्रक्रिया व हाडाचे आजार अशा महत्त्वाच्या आजारांवर आर्थिक मदत केली जाते. याकरिता मुख्यमंत्र्यांनी ओमप्रकाश शेट्ये यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.शेट्ये यांनी अनेक गरीब व गरजू रुग्णांना वेळेत मदत केली. रुग्णाच्या नातेवाइकांनी अर्ज सादर केल्यानंतर तत्काळ अर्जाची छाननी करून आर्थिक मदत रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते.
अशिक्षित रुग्णांच्या नातेवाइकांना अर्ज भरण्याची मदतही कार्यालयातून केली जाते; परंतु सरकार बदलले, मुख्यमंत्री बदलले. मात्र, अद्याप कक्षात नवीन अधिकाऱ्यांचीनेमणूक करण्यात आली नाही, त्यामुळे हजारो रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही जबाबदारी पुन्हा ओमप्रकाश शेट्ये यांना द्यावी. ओमप्रकाश शेट्ये यांनी अनेक रुग्णांना न्याय देण्यासाठी निस्वार्थीपणे काम केले आहे. त्यांनी माथेरानच्या अनेक रुग्णांना आर्थिक मदत केली असल्याने शेट्ये यांची कक्षप्रमुखपदी नवीन सरकारने नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत कदम यांनी के ली आहे.