आविष्कार देसाई, अलिबागदिवाळी सणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नसला, तरी ११ ते १५ नोव्हेंबर असा सलग सुट्यांचा महाधमाका प्राप्त झाला आहे. विविध खाजगी आस्थापनांनीही सरकारचे अनुकरण करीत आपापल्या कर्मचाऱ्यांना सुट्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी ही चांगली पर्वणी असल्याने रायगड जिल्ह्यातील पर्यटनाचे हॉट डेस्टिनेशन पर्यटकांनी हाऊसफुल्ल राहणार आहेत.दिवाळीचा सण कुटुंबांसह साजरा केल्याने त्यांचा आनंद काही औरच असतो. थोरामोठ्यांच्या भेटी, लहानग्यांबरोबर फुल टू धम्माल करण्यासाठी निवांत वेळ सलग सुट्यांच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. पर्यटनाची हौस असणाऱ्यांनी सलग आलेल्या सुट्या जर का एन्कॅश केल्या नाहीत, तर नवलच. काहींनी तर सहकुटुंब पर्यटनासाठी जाण्याचे प्लॅनिंगही आधीच करुन ठेवलेले आहे. रायगडातील पर्यटक पुणे, कोल्हापूर, शिर्डी, औरंगाबाद, राजस्थान, केरळ अशा ठिकाणी जाण्याच्या तयारीत आहेत. अलिबाग, मुरुड, माथेरान ही ठिकाणे मुंबई, पुण्यापासून जवळ आहेत. त्यामुळे येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. ही ठिकाणे पर्यटकांची हॉट डेस्टिनेशन म्हणून प्रिय झाली आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरातून पर्यटक पर्यटनासाठी येणार आहेत. त्यामुळे अलिबाग, माथेरान, मुरुड, श्रीवर्धन या ठिकाणचे हॉटेल, लॉजिंग फुल्ल राहणार असल्याचे येथील हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.दिवाळीत ११ ते १५ नोव्हेंबर अशा सलग आलेल्या सुट्यांमुळे कर्मचारी खूश झाले आहेत. १६ नोव्हेंबर २०१५ ला आता कार्यालये उघडली जाणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सरकारी तसेच खासगी आस्थापनांवर काम करणाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबर तर काहींनी ९ नोव्हेंबरच्या दुपारनंतर रीतसर सुटी घेत आपल्या सुट्यांची संख्या वाढविली आहे.
दिवाळीत सुट्यांचा महाधमाका
By admin | Published: November 10, 2015 12:46 AM