Atal Bihari Vajpayee : ग्वाल्हेरच्या वाड्यात जनसंघाच्या बैठका, रघुजीराजे आंग्रे यांनी दिला आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:31 AM2018-08-17T02:31:55+5:302018-08-17T02:32:48+5:30

राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Atal Bihari Vajpayee : Jan Sangh meetings in Gwalior ward, Raghujiraje Angre highlighted the memories | Atal Bihari Vajpayee : ग्वाल्हेरच्या वाड्यात जनसंघाच्या बैठका, रघुजीराजे आंग्रे यांनी दिला आठवणींना उजाळा

Atal Bihari Vajpayee : ग्वाल्हेरच्या वाड्यात जनसंघाच्या बैठका, रघुजीराजे आंग्रे यांनी दिला आठवणींना उजाळा

Next

- जयंत धुळप
अलिबाग - राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. ग्वाल्हेरमधील बालपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अटलबिहारी वाजपेयी यांचे बंधू बृजबिहारी वाजपेयी हे ग्वाल्हेरमधील आमच्या संभाजी विलास वाड्याच्या शेजारीच राहायला होते. माझे मोठे काका सरदार संभाजीराजे आंग्रे आणि त्यांचा अत्यंत घनिष्ट स्नेह होता. माझ्या बालपणी अटलबिहारी वाजपेयी, राजमाता विजयाराजे शिंदे ही सारी त्या वेळची जनसंघाची मंडळी संभाजी विलास वाड्यात आवर्जून येत असत.
ग्वाल्हेरच्या संभाजी विलास वाड्यात धोतर, कुडता, जोडे आणि उंच काळे मोजे घालून येणारी व्यक्ती किती महान आहे, हे समजायला वयाची १२ वर्षे जावी लागली. राजमाता विजयाराजे शिंदे, थोरले काका सरदार संभाजीराजे, बाबा यांच्याशी गप्पांत रंगणारे कविमनाचा राजकारणी भारतीय राजकारणातील मातब्बर होते.

रोह्यात १९८२ मध्ये वाजपेयींबरोबर लाभला सहवास

अटलबिहारी वाजपेयी यांचा एक तासाचा सहवास अलिबागचे नंदकुमार चाळके व त्यांचे आणीबाणीतील सहकारी गिरीश तुळपुळे यांना रोहा येथे १९८२ मध्ये लाभला. तत्कालीन संघाचे ज्येष्ठ सदस्य माधवराव वैद्य यांच्या निवासस्थानी वाजपेयी यांच्या समवेत भेट झाली होती.
राजकारण, साहित्य, कविता, समाजकारण, संस्कृती, इतिहास अशा अनेक विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्या वेळी अलिबागमध्ये आम्ही संघ विचाराच्या एका साप्ताहिकाचे काम करीत होतो. त्याच साप्ताहिकाचा अटलजींवरील विशेषांक केला होता. त्याचे प्रकाशन त्यांनी केले. संपूर्ण अंकातील मजकूर जाणून घेतला आणि दिलेली शाब्बासकीची थाप आजही स्मरणात असल्याचे चाळके सांगतात.
वाजपेयी यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभल्याने त्यांची वैचारिक प्रगल्भता अनुभवल्याने आयुष्यच बदलून गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असताना नाशिक कारागृहात एक महिना तर ठाणे कारागृहात १२ महिने असा एकूण १३ महिने कारावास भोगला. अटलजींचे साहित्य मनात घर करून गेल्याचेही त्यांनी अखेरीस सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी विरुद्ध माधवराव शिंदे ग्वाल्हेरची निवडणूक

वाजपेयी हे वारंवार ग्वाल्हेरमध्ये येत असत आणि त्यांच्या बैठका वाड्यात होत. त्या वेळी ग्वाल्हेर हा अटलबिहारी वाजपेयी यांचा मतदार संघ होता. १९८३ मध्ये वाजपेयी यांनी माधवराव शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ती निवडणूक आणि त्या वेळच्या प्रचाराची धामधूम आजही स्मरणात असल्याचे रघुजीराजे यांनी सांगितले.

माझ्या उपनयन सोहळ््यासाठी अटलबिहारी येणार होते, परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर आवर्जून ते भेटण्यासाठी वाड्यात आले होते. माझी शेंडी हातात घेऊन दीर्घायुष्यासाठी आशीर्वादही दिले होते.
- रघुजीराजे आंग्रे


देशासाठी समर्पित जीवन जगणारे राजकारणातील अटल नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीचेच नव्हे, तर देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
- रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड />
पराकोटीची संवेदनशीलता जपणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे, देशाने उत्तम संसदपटू गमावला आहे.
- आमदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष

कणखर आणि सहृदयी नेता भारताने गमावला आहे. त्यांच्या जाण्याने भाजपाबरोबरच देशाची प्रचंड हानी झाली आहे. लाल बहादूर शास्त्रींच्या पठडीतील अटलजींनी, ‘जय जवान, जय किसानच्या जोडीला जय विज्ञान’ची जोड देऊन देशाच्या प्रगतीला दिशा दिली.
- आमदार प्रशांत ठाकूर

प्रतिभावंत, प्रगल्भ, सर्वसमावेशक, मानवतावादी, राजकीय विचारसरणीचे, अजातशत्रू असे नेते आपल्यातून गेले आहेत. खंबीर कवी मनाचा माणूस असूनही प्रयोगशील राष्ट्रीय धोरणाने त्यांनी आंतरराष्ट्रीय छाप पाडली होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
- सतीश धारप,
रायगड उपाध्यक्ष, भाजपा

Web Title: Atal Bihari Vajpayee : Jan Sangh meetings in Gwalior ward, Raghujiraje Angre highlighted the memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.