- नामदेव मोरेनवी मुंबई : दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळासाठी प्राथमिक तयारी त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्या निधनामुळे रायगडसह विमानतळ विकासाचे स्वप्न पाहणारे द्रष्टे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.१८ फेब्रुवारी २०१८ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली. या वेळी पंतप्रधानांनी विमानतळाच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण वाढू लागल्यामुळे १९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न पाहण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. वाजपेयी यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारू लागले आहे. भविष्याचा वेध घेऊन त्यांनी नवी मुंबई विमानतळासाठीची प्राथमिक तयारी सुरू केली होती. २००४ मध्ये वाजपेयी सरकार सत्तेवर असतानाच विमानतळासाठी सीआरझेड अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली होती व व नवी मुंबईमधील ग्रीनफिल्ड एअरपोर्टसाठी महत्त्वाची परवानगीही मिळाली होती. यामुळे नवी मुंबईमध्ये वाजपेयी प्रत्यक्षात महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी आले नसले तरी विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाची चाचपणी त्यांच्याच कार्यकाळात झाली होती. वाजपेयी यांनी पाहिलेल्या विमानतळाचे स्वप्न राज्यात व देशात भाजपाची सत्ता असतानाच प्रत्यक्ष साकार होऊ लागले असून, वेगाने विमानतळ उभारणीची कामे सुरू झाली आहेत.३ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. या वेळी त्यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधीची घोषणाही केली होती. मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर भाजपाचीच सत्ता असताना रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील विमानतळ व दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या संवर्धनाचे स्वप्न पाहणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Atal Bihari Vajpayee : रायगड विकासाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:26 AM