बोर्लीपंचतनमधील एटीएमची सेवा ठप्प; तीन दिवसांपासून होतेय नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 02:00 AM2019-12-06T02:00:41+5:302019-12-06T02:00:51+5:30
बोर्ली येथील बँकेत बोर्लीपंचतन, दिवेआगर, वडवली, दिघी, शिस्ते, कापोली, कुडगाव तसेच दांडगुरी आदी गावांतील व्यवहार होतात.
दिघी : श्रीवर्धन तालुक्यात जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी ‘एटीएम’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्याकडे मात्र संबंधित बँकांचे दुर्लक्ष होत आहे. तांत्रिक बिघाड, पुरेशा रकमेअभावी वारंवार ‘एटीएम’ मशिन बंद असल्यामुळे ऐन पर्यटन हंगामात ग्राहकांची गैरसोय होत आहे.
बोर्ली येथील बँकेत बोर्लीपंचतन, दिवेआगर, वडवली, दिघी, शिस्ते, कापोली, कुडगाव तसेच दांडगुरी आदी गावांतील व्यवहार होतात. तसेच येथे प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर असल्याने येथे राष्ट्रीयकृ तबँक बोर्ली शहरात आहेत. येथे नेहमीच नागरिकांची व पर्यटकांची धावपळ पाहायला मिळते. शहरात दोनच एटीएम आहेत. मात्र, बहुतेक वेळी त्या दोन्ही मशिन शोभेच्या वस्तू बनतात. धावपळीच्या युगात रांगेत उभे राहून बँकेत पैसे काढण्यासाठी बहुतांश नागरिकांकडे वेळ नाही. याशिवाय नोटाबंदीनंतर एकीकडे कॅशलेस व्यवहाराचा वापर वाढावा, यासाठी धोरणे आखली जात असली तरीही प्रत्यक्षात कॅशलेसचे मशिन मात्र फार दूर असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. ‘नव्याचे नऊ दिवस’ बँकेने चांगली सेवा दिली होती; परंतु कालांतराने बँकेच्या सेवेत त्रुटी निर्माण झाल्या. त्यामुळे येथील बँकांच्या ‘एटीएम’ सेवा, ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहे.
बोर्लीपंचतन शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुविधांची वानवा आहे. एटीएम बंद, बँकेतील असुविधा अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदासीनता यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. याबाबत तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने आहे त्या स्थितीत व्यवहार पार पाडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे लक्ष देत बँकांतील असुविधा दूर कराणी, अशी मागणी होत आहे.