सुधागडात बिबट्यांचा वावर?; नवघरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:41 PM2020-02-05T23:41:54+5:302020-02-05T23:41:58+5:30
वनविभागाला दिली माहिती
- विनोद भोईर
पाली : सुधागड तालुका हा प्रामुख्याने घनदाट जंगल, डोंगर कपारीत, दऱ्या खोऱ्यांमध्ये वसलेला तालुका आहे. सुधागडच्या सभोवताली सह्याद्री पर्वतांच्या रांगा आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. वन्यजीवांचा वावर हा या ठिकाणी सर्रास आढळून येतो. अशाच प्रकारे सुधागडातील आसरे-नवघर गावापासून काही मीटरच्या अंतरावर असलेल्या जंगलातून सलग १५ दिवस दोन बिबट्यांचा वावर आढळून आल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाला माहिती कळविण्यात आली आहे.
नवघर येथील आदिवासीवाडीलाच लागून असलेल्या जंगलातून दोन बिबटे रोज पाण्याच्या शोधात जंगलातून खाली उतरत असताना, तेथील शेतात काम करणारा मजूर दत्ता बारकू हिलम याने पहिले. एवढेच नसून त्या बिबट्याने एक बैल मारल्याचेदेखील दत्ता हिलम यांनी निदर्शनास आणून दिले. बिबट्यांचा वावर हा सतत काही दिवस असल्याने त्यांनी ही बाब गावकºयाच्या निदर्शनास आणून दिली.
तत्काळ नवघर ग्रामपंचायतीतील सदस्यांनी व गावकºयांनी ही बाब वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळवली, त्यानुसार वनक्षेत्र अधिकाºयांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेत त्या ठिकाणी वनपाल बी. डी. कराडे यांच्यासमवेत वनरक्षक जे. एम. गायकवाड, मुकेश पाटील व एस. बी. चव्हाण यांच्या देखरेखीखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वन्यप्राण्यांच्या बाबतीत कशा प्रकारे सतर्कता बाळगावी, या बाबतीतही अधिकाºयांनी गावकºयांमध्ये जनजागृती केली. तसेच गावकºयांच्या जीवितास धोका पोहोचणार नाही, याबाबतची उपाययोजना वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी करावी, असेही गावकºयांकडून सांगण्यात येत आहे.
नागरिकांनी वा गावकऱ्यांनी कोणीही त्या ठिकाणी जाऊ नये, जंगल हे वन्यप्राण्यांचे घर आहे. प्राणी आपल्या बचावासाठी प्रतिहल्ला करतात, त्यासाठी आपण त्यांना उकसाऊ नये, तसेच प्रत्येक नागरिकाने, गावकऱ्यांनी आपापल्या जीवाची पर्वा करून सतर्कता बाळगावी. लहान मुलांना त्या ठिकाणी पाठवू नये. रात्रीच्या वेळेस दरवाजे-खिडक्या बंद कराव्यात.
- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल,पाली-सुधागड
आसरे-नवघर गावालगत काही मीटरच्याच अंतरावर जंगल असल्याने बिबट्याच्या दहशतीने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; परंतु वनरक्षक अधिकाºयांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्हास सहकार्य करावे.
- विवेक रोकडे, सदस्य, नवघर ग्रामपंचायत