कार्लेखिंड : वातावरणात उष्मा वाढल्यामुळे भाजी आणि आंबा फळ यावर उष्णतेमुळे परिणाम होऊन उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या वातावरणात चढलेला पारा हा जास्त कोकण विभागात जाणवत आहे आणि याचा त्रास मनुष्य, प्राणी यांच्यासह झाड, वेल यांनाही बसत आहे.अलिबाग तालुक्यात रबी हंगामात आंबा, तोंडली, कारली, दुधीभोपळा, पडवळ, वाल आणि घेवडा आदी प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मार्च एप्रिल, मे महिन्यात या भाज्यांचे उत्पादन भरपूर मिळते; परंतु गेल्या आठ दिवसांपासून अचानक वातावरणात उष्मा वाढल्याने त्याचा परिणाम शेतातील भाज्यांवर होऊ लागला आहे. दररोज ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असल्याने गरम वाफ मारत आहे. शेतातील पालेभाजी व वेली उष्म्यामुळे सुकून जात आहेत. सतत दोन वर्षे शेतकरी नुकसान सहन करीत आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या लाॅकडाऊनमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते आणि यावर्षी या उष्म्यामुळे शेती उत्पादन थांबून आर्थिक नुकसान होणार आहे. दरवर्षीच्या सरासरी उत्पादनापेक्षा यावर्षी ३० ते ४० टक्केच शेतमाल वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्यात होत आहे. अलिबाग तालुक्यात रबी हंगामात दरवर्षी खालील भाज्यांची अंदाजित लागवड व उत्पन्न घेतले जाते.
वातावरणातील उष्मांकामुळे फळ भाजी उत्पादनात झाली घट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 1:55 AM