बदनामी करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करणार!
By admin | Published: April 12, 2016 12:39 AM2016-04-12T00:39:03+5:302016-04-12T00:39:03+5:30
बनावट कागदपत्रे तयार करून समाज कल्याण विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरू केला आहे. समाज कल्याण विभागात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही.
अलिबाग : बनावट कागदपत्रे तयार करून समाज कल्याण विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरू केला आहे. समाज कल्याण विभागात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. याविरोधात अॅट्रॉसिटी आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती समाज कल्याण सभापती गीता जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मागासवर्गीयांनी पुरविण्यात येणाऱ्या संगणक खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होऊन शिवसेनेत गेलेले रायगड जिल्हा परिषद सदस्य अॅड. राजीव साबळे यांनी केला होता. संगणक वाटपासाठी २५ लाख रुपयांची तरतूद समाज कल्याण विभागाने केली होती. सरकारच्या निर्देशानुसारच कोनीका मिन्लोटा बिझनेस सोलुशन इंडिया प्रा. लि. या संस्थेकडून संगणक खरेदी करण्यात आले होेते. जिल्ह्यातील ६७ मागासवर्गीयांची यासाठी निवड करण्यात आली आहे. ३६ हजार ९४५ रुपयांप्रमाणे २४ लाख ७५ हजार ३१५ रुपये खर्च करण्यात आले. मात्र साबळे यांनी ६६ संगणकांसाठी ४५ हजार ८५० रुपयांप्रमाणे ३१ लाख ७७ हजार ४०५ रुपये खर्च केल्याचे सांगितले होते. साबळे यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे आणि तत्कालीन समाज कल्याण अधिकारी संदीप जाधव यांच्या खोट्या सह्या असल्याचा दावा गीता जाधव यांनी केला. समाज कल्याण विभागाकडे असणारा सर्व दस्तऐवजांचा रेकॉर्ड त्यांनी पत्रकार परिषदेत उघड केला.
साबळे यांनी समाज कल्याण विभागाची बदनामी केली आहे. भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले आहेत. साबळे यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. आरोपामध्ये तथ्य नसून मी कोणत्याही चौकशीला जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केल्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हा कसा दाखल करता येईल असा प्रश्न जि.प सदस्य अॅड. राजीव साबळे यांनी के ला.
दोन वेगवेगळी कागदपत्रे
समाज कल्याण विभागातून दोन वेगवेगळी कागदपत्रे पुढे येत असतील, तर ही गंभीर बाब आहे. अन्य योजनांमध्येही भ्रष्टाचाराला वाव आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अॅड. राजीव साबळे यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांच्या सह्या आढळल्याने त्यांनी पोलीस कारवाईची मागणी करणारे पत्र समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी के ला.