महाड : घरात एकट्या असलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिला जखमी करण्याची घटना मंगळवारी महाड औद्योगिक वसाहतीमधील नांगलवाडी फाटा येथे घडली. चोरी, दरोड्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.महाड औद्योगिक वसाहतीमधील नांगलवाडी फाटा येथे हा प्रकार घडला. या ठिकाणी असलेल्या नोबल वे ब्रिजच्या मागच्या बाजूला याच वे ब्रिजचे मालक सुभाष शेठ राहतात. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुभाष शेठ हे आपल्या दुकानात आणि सुनीता शेठ या घरी एकट्याच असताना, एका व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करत त्यांना लाकडी धोपटण्याच्या साह्याने मारहाण केली. त्यात त्या बेशुद्ध झाल्या. हा प्रकार लक्षात येईपर्यंत या हल्लेखोरांनी पलायन केले होते. सुनीता शेठ या मारहाणीमुळे अर्धवट बेशुद्धावस्थेत असल्याने नक्की काय घडले, या चोरट्यांनी काही चीजवस्तू लंपास केल्या आहेत का, याची माहिती त्या देऊ शकलेल्या नाहीत.एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पो. नि. पंकज गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील यांच्यासह पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार एका संशयिताला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.
घरी एकट्या असणाऱ्या महिलेवर हल्ला, चोरीचा उद्देश असल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 12:11 AM