रायगड - रायगड जिल्ह्याला शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती. त्यामुळे सुदैवाने जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, भूकंप हादऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दरडप्रवण गावातील जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेबाबतीत अधिक सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील माहितीनुसार, शुक्रवार 13 जुलै रोजी रात्री 9 वा. 31 मिनिटांनी रायगड, ठाणे व कल्याण-डोंबिवली परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू 19.1 उत्तर अक्षांश, 73.2 पूर्व रेखांश तर पाच किमी खोलवर होता. भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन जिल्ह्यातील स्थितीविषयी माहिती घेतली. जिल्ह्यातील दरडप्रवण गावांमध्ये अधिकाऱ्यांनी अधिकाधिक सतर्कता बाळगावी असे निर्देशही दिले.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात 103 गावे दरडप्रवण आहेत. धोक्याच्या पातळीनुसार जिल्ह्यातील 9 गावे ही वर्ग 1 (अतिधोकेदायक), 11 गावे वर्ग 2 मध्ये तर उर्वरित 83 गावे ही वर्ग 3 या श्रेणीत समाविष्ट करण्यात आली असून ही गावे तालुकानिहाय आहेत. त्यात महाड तालुक्यात 49, पोलादपुर तालुक्यात 15, रोहा तालुका 13, म्हसळा-6, माणगाव 5, सुधागड, खालापूर, कर्जत, पनवेल प्रत्येकी 3, तर श्रीवर्धन तालुक्यात 2 आणि तळा तालुक्यात 1 अशी एकूण 103 गावे दरडप्रवण आहेत. मे महिन्यातच प्रशासनाने या गावातील 515 गावकऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. नुकतेच गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील दरडप्रवण गावांना प्रत्यक्ष भेटीही दिल्या. या भेटीत अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.
दरडप्रवण गावात प्रशासनातर्फे घेण्यात आलेली खबरदारी : -कमी वेळेत 500 मि.मि.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते. तर दरडग्रस्त गावातील नागरिकांनी जवळच्या महसूल मंडळस्तरीय पर्जन्यमापक यंत्रावरील दैनंदिन पावसाच्या नोंदीची माहिती घेऊन अतिवृष्टी होत असल्यास स्थलांतरीत व्हायचे असते. याबाबत गावातील लोकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. दरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील बाजूस डोंगर कापण्याची कामे (सुरु असल्यास) बंद करण्यात आली आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी वाहून नेणाऱ्या मार्गातील अडथळे दूर करण्यात आले आहेत. डोंगर उतारावरील मोठे दगडही हटवण्यात आले आहेत.