मुरुडमध्ये पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील
By admin | Published: December 30, 2016 03:57 AM2016-12-30T03:57:58+5:302016-12-30T03:57:58+5:30
आज देशाला परकीय चलन जर कोणत्या माध्यमातून मिळत असेल तर ते पर्यटनाच्या माध्यमातून मिळत आहे. देशाचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी परकीय चलन खूप
नांदगाव/ मुरु ड : आज देशाला परकीय चलन जर कोणत्या माध्यमातून मिळत असेल तर ते पर्यटनाच्या माध्यमातून मिळत आहे. देशाचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी परकीय चलन खूप महत्त्वाचे आहे. पर्यटन हे फार मोठे क्षेत्र असून गोवा राज्याला सर्वाधिक परकीय चलन पर्यटकांमुळे मिळत आहे. मुरु ड हे सुद्धा एक चांगले पर्यटन स्थळ असून याच्या विकासाची जबाबदारी शिवसेनेने घेतली असून लवकरच जास्तीत जास्त सुविधा राज्य सरकारमार्फत आम्ही मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी केले.
नुकतेच मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून त्यांच्या हस्ते या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देसाई बोलत होते. प्रकाश देसाई म्हणाले, मुरु ड समुद्रकिनारी लवकरच केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या माध्यमातून चेंजिंग रूम व स्वच्छतागृह होणार आहे. अन्य सुविधा सुद्धा विविध मंत्र्यांच्या मार्फत आम्ही मिळवून देऊ. लवकरच मुरु ड शहराला अंतर्गत रस्ते, विविध हॉटेल व्यावसायिकांसाठी असणाऱ्या सुविधा पुरविल्या जातील, असे ते यावेळी म्हणाले. मुरुड शहरात हिंदू-मुस्लीम एकोपा असून यापुढेही हा एकोपा असाच कायम राहील. मुरुड शहराला असणारे सांैदर्य हे अप्रतिम असून यामध्ये विकासकामांची भर देऊन या सौंदर्यात भर पाडण्याची आमची टीम निश्चित कार्यवाही करेल, असे ते म्हणाले.
केदार जोशी म्हणाले की, कोकण हा सागरी किनारी वसलेला असून येथे मुळातच सृष्टीसांैदर्य आहे. येथे पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी सुरक्षितता, सोयी-सुविधा, स्वच्छता या गोष्टी पाळल्या तर भविष्य काळात बहुसंख्येने येथे पर्यटक येतील. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी पर्यटन महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिक्षक तसेच नगरपरिषद कर्मचारीवृंद व स्थानिक नागरिक अथक परिश्रम घेऊन यशस्वी करत असतात. पर्यटकांना विविध कार्यक्र म पहाता यावे, पर्यटकांची संख्या वाढावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दरवर्षी पर्यटन महोत्सवाचे नियोजन करीत असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी अष्टविनायक मंडळाचे महड देवस्थानचे मुख्य ट्रस्टी केदार जोशी, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, आमदार भरत गोगावले, तालुका प्रमुख नीलेश घाटवल, पर्यटन महोत्सवाचे कार्याध्यक्ष महेश भगत, माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)