"तर मी चोरी केली नसती, माफ करा"; कविवर्य नारायण सुर्वेंचा उल्लेख करत चोराची भावनिक चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 05:28 AM2024-07-16T05:28:00+5:302024-07-16T05:29:46+5:30
Poet Narayan Surve: चोराला भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो, त्यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतिचिन्हे, मानपत्रे वगैरे दिसून आले.
कांता हाबळे
नेरळ (जि. रायगड) : ‘कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकविता आले असते... या ओळी लिहिणारे प्रख्यात दिवंगत कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या आयुष्यभराची कमाई म्हणजे लाखमोलाची शब्दसंपत्ती... ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली...’ असे म्हणणाऱ्या सुर्वेंना अखेरच्या क्षणापर्यंत खस्ताच खाव्या लागल्या. त्यानंतर त्यांना नेरळमध्ये हक्काचे घर मिळाले, पण त्याच घरात चोरी झाली. परंतु, विशेष हे की, त्या चोराला जेव्हा समजले, हे कविवर्य नारायण सुर्वेंचे घर आहे तेव्हा खजील होऊन त्याने चोरलेला सर्व मुद्देमाल परत करण्याची कबुली देणारी चिठ्ठीच घराच्या भिंतीवर चिकटवली.
त्याचे झाले असे... येथील गंगानगर परिसरात नारायण सुर्वे यांचे घर आहे. या घरात त्यांची मुलगी सुजाता आणि जावई गणेश घारे राहतात. घारे दाम्पत्याने सुर्वे यांच्या सर्व स्मृती या घरात जपून ठेवल्या आहेत. घारे दाम्पत्य दहा दिवसांसाठी मुलाकडे विरार येथे गेले होते. घर बंद असल्याचे हेरत चोराने शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे यांच्या घरात शिरकाव केला. दागदागिने, पैसे सापडले नाहीत म्हणून त्याने एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी तसेच धान्याकडे मोर्चा वळवला. सलग दोन-तीन दिवस चोराच्या घरात वाऱ्या सुरू होत्या.
सुर्वेंचा फोटो दिसला अन्...
चोराला भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो, त्यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतिचिन्हे, मानपत्रे वगैरे दिसून आले. त्यानंतर हे घर कविवर्य नारायण सुर्वे यांचे असल्याचे त्याच्या लक्षात आले. आपल्या कृतीचा पश्चात्ताप झालेल्या चोराने मग चोरून नेलेल्या वस्तू एकेक करून परत आणायला सुरुवात केली.
टीव्ही पुन्हा जागेवर आणून ठेवला. तसेच भिंतीवर एक चिठ्ठी चिकटवून आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या. चोरीचा हा प्रकार घारे दाम्पत्य रविवारी घरी आल्यानंतर समोर आला.
काय म्हटले आहे चिठ्ठीत?
मला माहिती नव्हते की, नारायण सुर्वे यांचे घर आहे, नाही तर मी चाेरी केली नसती. मला माफ करा. मी, जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे. मी टीव्ही पण नेला हाेता परंतु आणून ठेवला. साॅरी...
कवी नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी झाली आहे. या चोरी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोराने आणून ठेवलेल्या टीव्हीचे फिंगर प्रिंट, तसेच नेरळ शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.
- शिवाजी ढवळे, पोलिस निरीक्षक, नेरळ